टीम मंगळवेढा टाईम्स।
वर्षभरात आपण तीन नवरात्री साजरी करतो. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि शाकंबरी नवरात्र. आजपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे.
ही नवरात्र देशभरात सर्वत्र विविध पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात घटस्थापनेला महत्त्व आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करण्याचा प्रघात आहे. त्यासाठी कोणता सुमुहूर्त आहे आणि यथायोग्य विधी काय आहे ते जाणून घेऊया.
आजचा घटस्थापना मुहूर्त
आज ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून १७ मिनिट ते सकाळी १० वाजून १७ मिनिटा पर्यंत घटस्थापना करता येईल. जर तुम्हाला या वेळेत घटस्थापना करणे शक्य नसेल, तर सकाळी ११ वाजून ५२ मिनिट ते १२ वाजून ३८ मिनिटांच्या पर्यायी मुहुर्तात घटस्थापना करून पूजा करू शकता.
घटस्थापना विधी
घट बसतेवेळी देवीची पूजा करावी. पूजा केलेला टाक घ्यावा. अभिषेक करावा नंतर स्थापना करावी. स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाट घ्यावा. त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवावा. पाण्यात पैसे, सुपारी घालावी. तांब्यावर गव्हाने भरलेले लहान ताम्हन ठेवावे. त्यात देवीचा टाक ठेवावा.
हळद-कुंकू गंध, फुल यांनी पूजा करावी. या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते. पाटापुढे शंख, घंटा ठेवावी. खाली पत्रावळ ठेवून पत्रावळीवर चाळलेली काळी माती टाकून गहू, पुन्हा माती, पुन्हा गहू पेरावेत. असे दोन तीन वेळा करावे. मध्ये पेल्यासारखे भांडे ठेवून त्यांची पूजा करावी.
यात पाणी, हळद, कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडावी. कलशाची पूजा करावी. पाटावर रांगोळी काढावी. कारळ्याच्या फुलांची किंवा झेंडुच्या फुलांची माळ करावी. ही फुले मिळाली नाहीत, तर अन्य कोणत्याही सुवासिक फुलांची माळ नवरात्रीत नऊ दिवस घटावर रोज एक याप्रमाणे बांधावी.
शक्य झाल्यास नवरात्रीत नऊ दिवस चोवीस तास समई तेवत ठेवावी. ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी दोन वेळा माळा घालून नऊ दिवसांच्या माळा पूर्ण कराव्यात. रोज आपण फराळाचे जिन्नस करतो, त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर फराळ करावा. रोज सायंकाळी देवीची आरती, जप, पोथीवाचन करावे.
नवरात्रीत बसवला जाणारा घट हा पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. ही पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, आप, तेज आणि वायू. घटस्थापनेच्या निमित्ताने आपण पंचमहाभूतात वसलेल्या देवांना आपल्या घरात येण्याचे आमंत्रण देतो.
या चराचरात सामावलेली ऊर्जा घटस्थापनेमुळे आपल्या घरात एकवटते आणि त्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाने वास्तुदोष दूर होतात. घरात शांतता नांदते. देवीच्या आगमनाबरोबर घरात नवचैतन्य, उत्साह, ऊर्जा यांचा समावेश होतो.(स्रोत:लोकमत)
आजपासून मंदिरे उघडली: धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली; पण पाळावी लागणाार कोरोनाची नियमावली
कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज