टीम मंगळवेढा टाईम्स ।
आजकाल ऑनलाईन खरेदी एकदम चुटकीसरशी होऊ लागली आहे. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागविल्यास त्यात ग्राहकाला भलतीच गोष्ट मिळत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात.
आता नाशिकमध्ये देखील असाच काहीसा प्रकार समोर आला असून फ्लिपकार्ट कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी केलेले मोबाईल ग्राहकापर्यंत जाण्याआधीच ते काढून घेत त्यात फरशी पॅक करून ग्राहकांची फसवणूक करणारी टोळीच नाशिक पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सध्याच्या हायटेक युगात अनेकजण मोबाईलवरून एखाद्या शॉपिंग वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन खरेदी करत असतात. मात्र यातून फसवणूकहोण्याचा धोका अधिक असतो, असे या घटनेवरून दिसून आले.
फ्लिपकार्ट कंपनीमध्ये ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या मोबाईलचा परस्पर अपहार होत असल्याचे येथील फ्लिफकार्ट कंपनीचे संलग्न असलेल्या इस्टाकार्ड कंपनीच्या मॅनेजरला ही बाब निदर्शनास आली. त्याने पोलिसांशी संपर्क केल्यानंतर फ्लिफकार्टमधील कामगारांचे ग्राहकांची फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.
मोबाईल काढून घेत फरशी ठेवून कंपनीला परत पार्सल देणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 3 लाख सहा हजार 582 रुपयांचे 10 मोबाईल जप्त केले.
फ्लिफकार्ट डिलिव्हरीकरीता कंपनीतून आलेले फोन कंपनीचे व इतर कंपनीचे 51 मोबाईलचा त्यांचे कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयम्हणून काम करणारा संशयित बळीराम रावजी खोकले याने मोबाईल डिलिव्हरी न करता परस्पर लंपास केले होते.
याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन येथे फ्लिपकार्ट कंपनीचे संलग्न असलेली इस्टाकार्ड कंपनीचे नाशिक शाखेचे मॅनेजर दिनेश ज्ञानेश्वर पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकने तपास सुरु केला.
तपास सुरु असताना फिर्यादीत नमुद असलेला बळीराम खोकले नावाचा इसम हा सदर कंपनीत कधी कामास नव्हता. त्याच्या नावाचा वापर करून अनोळखी व्यक्तीने गुन्हा केला आहे. त्यावर तपासात धक्कादायक माहिती समोर आली.
कॅशिफाय या ऑनलाईन जुने मोबाईल खरेदी विक्री कंपनीत काम करणारा संशयित निखील पाथरवट व कॅशिफाय कंपनीमध्ये पूर्वी काम करणारा आकाश शर्मा यांनी एकत्र मिळून फ्लिपकार्ट कंपनीचे नाशिक विभागातील संलग्न असलेल्या इस्टाकार्ड कंपनीचे एच. आर विभागात काम करणारा निखील मोरे यांच्याशी संगनमत केले. त्यांच्या ओळखीचा वापर करत अमोल खैरे यास कंपनीमध्ये बळीराम खोकले नावाने कामास लावले होते.
त्यानंतर बळीराम खोकले नावाने काम करीत असलेला अमोल खैरे हा कंपनीमध्ये आलेले मोबाईलचे पार्सल डिलिव्हरीसाठी बाहेर घेऊन जात असे. त्यानंतर आकाश शर्मा व निखील पाथरवट त्यामधील मोबाईल काढुन घेवुन त्यात मोबाईलच्या वजनाची फरशी टाकुन तो पुन्हा पॅक करत असे.
सदर पार्सल ग्राहकांची डिलेव्हरी न झाल्याचे सांगुन ते पार्सल पुन्हा कंपनीत जमा करायचे, अशा पध्दतीने अपहार करून काढलेले मोबाईल निखील पाथरवट विक्री करायचा. पोलीस तपासात फ्लिपकार्ट कंपनीचे पार्सल डिलिव्हरी करणारी संलग्न कंपनी इन्टाकार्ड कामगारच करीत असल्याचे व त्याचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज