टीम मंगळवेढा टाईम्स ।
मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सोबत न राहता महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं यावरुन राज ठाकरे यांनी टिकास्त्र सोडलं.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होणार नाही हे कळल्यानंतर शिवसेनेने भाजपसमोर मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षाचा दावा केला.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा चार भिंतीआड का झाली? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज्यातील विधानसभेची मागील निवडणूक आठवा, सोबत कोण होतं आणि विरोधात आहे. पळून गेले एकाबरोबर आणि लग्न कुणाबरोबर कळेनाच.
निकाल लागल्यावर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार कसा झाला की अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची ठरली होती. आधी जाहीर सभेत का नाही बोलले.
अमित शाह यांच्याशी बंद दाराआड का बोलणं केलं? दुसरीकडे अशी चर्चा झाली नसल्याचे अमित शहा यांनी सांगितलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं
महाराष्ट्राने असं राजकारण पाहिलं नाही.
एकमेकांना टीका करणारे आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला मतदान केलं होतं. मग सरकार महाविकास आघाडीचं का? मतदारांनी युती म्हणून तुम्हाला मतदान केलं.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायला मतं नाही दिली. राज्यातील जनतेशी गद्दारी का केली? मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही काय शिक्षा देणार? अशी विचारणा राज ठाकरे यांनी जनतेला केली.
महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भाजप, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक जेलमध्ये, पहिलं मंत्रिपद छगन भुजबळ यांना जाहीर केलं तेही दोन वर्षे जेलमध्ये होते. हे सगळं नाकावर टीच्चून केलं जातं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
जातीवादावरुन शरद पवारांवर थेट हल्ला
राज ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वावर बोलणार. माझ्या दृष्टीकोनातून हिंदुत्व काय हे मांडणार आहे. आयोध्येला जाणार की नाही तर जाणार. आता तारीख सांगत नाही. हिंदू मुस्लिम दंगलीत हिंदू आणि मुसलमान असतो.
26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला तो भारतीय असतो. चीनने आक्रमण केलं तर कळत नाही आपण कोण आहोत. मग जेव्हा हिंदू ना भारतीय असतो तेव्हा तो होतो मराठी, तमिळ, बंगाली, गुजराती पंजाबी. मग त्यावेळी आपण मराठी होतो.
मराठी झाल्यानंतर मग तो होतो मराठा, तो होतो माळी, तो होतो ब्राह्मण , आगरी. काही लोकांना ही गोष्ट हवी आहे. काही लोकं कशाला राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे.
शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. 1999ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. या आधी जात नव्हती का तर होती. पण त्यावेळी जातीचा अभिमान होता.
1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला. फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचं अमिष दाखवायचं. बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. इतिहास वाचायचा नाही.
लिहिलंय कुणी, पुरंदरे ब्राह्मण. अच्छा अच्छा.. म्हणजे त्याने काही तरी चुकीचं लिहिलं असणार. आम्ही इतिहास वाचतच नाही.
ज्या छत्रपती शिवरायाने स्वराज्यासाठी एक व्हा सांगितलं. तिथे जातीपातीवरून वाद सुरू आहे. राजकारण सुरू आहे. जातीतून बाहेर नाही पडणार तर हिंदू कधी होणार? असा सवालही राज यांनी यावेळी विचारला.
महाराष्ट्राची ही अवस्था करायची आहे का?
बाहेरच्या राज्यात ज्याप्रकारचं राजकारण चालतं ते करायचं आहे का? ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र जातीत खितपत पडलाय. हे शिदोरे बसले. उत्तर प्रदेशात गेले. एका ढाब्यावर खाटेवर बसले. चहा सांगितला. काऊंटरवरचा माणूस आला.
कौनसी जातसे हो. त्याने जात सांगितली. अरे इनको चाय देना, हे वातावरण महाराष्ट्रात आणायचं आहे का? ही अवस्था करायची महाराष्ट्राची? असे प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केलेत.
हिंदू म्हणून कधी एक होणार आहोत?
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जेम्स लेन जन्माला आला. कोण जेम्स लेन? तो आधी कधी माहिती नव्हता. आता काय करतो माहीत नाही. तो काय जॉर्ज बर्नाड शॉ होता? पुस्तकात काही तरी छापायचं आणि त्यावरून राजकारण करायचं त्या भिकारड्याने काही तरी लिहिलं आम्ही ते उगाळतोय.
ज्यांना इतिहास माहीत नाही. त्यावर सर्व माणसं प्रश्न विचारतात. काय लिहिलं पुस्तकात आम्ही आपली अब्रू काढतो. ज्यांचा देशाशी संबंध नाही, ते लोक येतात. काही तरी लिहितात त्यावरून राजकारण तापवलं जातं. ज्यांचा संबंध नाही अशी माणसे प्रश्न विचारतात लाज वाटते.
आमच्या देवतांची आम्ही अब्रु काढतोय. एवढंही भान नाही, कसलंही भान नाही. वेडेपिसे झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पैशाचा चारा टाकायचा आणि वेडेपिसे करायचे.
मागचा पुढचा विचार न करता डोके फोडतोय. जातीपातीतून बाहेर येत नाही. कोणता हिंदुत्वाचा ध्वज घेऊन बसलोय. हिंदू म्हणून कधी एक होणार आहोत? असला भावनिक सवालही राज यांनी जनतेला विचारलाय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज