टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यात झालेल्या जनसंवाद यात्रेत राष्ट्रवादीच्या या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी भाषण करण्यास सपशेल नकार दिला. त्यांच्या या नकाराची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील (स्व.) आमदार भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधून मतदारसंघातील प्रत्येक गावांत जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तथा भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांनी शनिवारी जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भगिरथ भालके यांनी शनिवारी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रमुख उपस्थित संवाद यात्रेचा प्रारंभ केला.
पंढरपूर विधानसभा मतदार मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर प्रशासनाने पोट निवडणूकीची तयारी सुरू केली आहे.
त्यानंतर आता विधानसभा पोट निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यातच आता विविध पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व.आमदार भारत भालके यांचे पुत्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी विधानसभा मतदार संघात जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवेढा येथे जनसंवाद यात्रेचा प्रारंभ केला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, माजी आमदार राजन पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार प्रणिती शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार व भावी आमदार म्हणून भगिरथ भालकेंचा उल्लेख करत, राष्ट्रवादी व काँग्रेस भालके कुटुंबियांच्या मागे ठाम असल्याचे सांगितले.
याचवेळी निवेदकाने आमदार संजय शिंदे यांचे नाव बोलण्यास घेतले असता, आमदार शिंदे यांनी चक्क मला बोलता येत नाही असे म्हणत व्यासपीठावर बोलण्यास सपशेल नकार दिला.
जनसंवाद यात्रेला शुभेच्छा तरी द्या असे व्यासपीठावरील मंत्र्यांसह उपस्थित नेत्यांनी.आग्रह करून देखील आमदार शिंदे यांनी नको असे म्हणत जागेवरच बसून राहणे पसंत केले.
एवढेच नाहीतर संपूर्ण कार्यक्रम संपे पर्यंत आमदार शिंदे यांनी कानात हेडफोन खालून मोबाईल पाहत होते. व्यासपीठावरील त्यांची देहबोली उपस्थितांना बरेच काही सांगून गेली. त्यामुळे आमदार संजय शिंदे यांच्या मनात वेगळंच काही तरी चालय काय ? अशी चर्चा देखील कार्यक्रम स्थळी सुरू होती.
भाजप आमदार प्रशांत परिचारकांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी आमदार संजय शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. आमदार परिचारक आणि आमदार संजय शिंदे यांचे राजकीय सख्य जग जाहीर आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात परिचारक शिंदेचा दोस्ताना आज ही कायम आहे. राष्ट्रवादीपासून दूर गेलेल्या परिचारकांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी आमदार संजय शिंदे प्रयत्नशील आहेत. आगामी पोट निवडणूकीच्या निमित्ताने शिंदेच्या या प्रयत्नांना गती आली आहे.
अलिकडेच आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्यात एक बैठक देखील घडवून आणली आहे. अशातच शनिवारी सोलापुरात शरद पवारांच्या कार्यक्रमात आमदार प्रशांत परिचारकांचे बंधु युटोपीयन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारकांच्या उपस्थितीमुळे आणखीणच पुष्टी मिळाली आहे.
राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर परिचारक निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र आमदार प्रशांत परिचारक की उमेश परिचारक लढणार या विषयी चर्चा सुरू आहे.
सोलापुरात पुन्हा राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमदार परिचारकांना राष्ट्रवादीत घेण्यास अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेतेही अनुकूल असल्याची चर्चा सुरू आहे. भालकेंच्या जनसंवाद यात्रे नंतर पंढपुरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज