टीम मंगळवेढा टाईम्स ।
माढा मतदार संघात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पाय अधिक खोलात घालतात की काय असे चित्र निर्माण झाले आहे.
लादलेला उमेदवार बिनकामाचा असून त्याला कडवा विरोध मतदार संघातील नागरिक करताना दिसत आहेत. सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे वाटल्याचे आरोप नेहमीच केले जातात.
परंतु त्यामधे कितपत तथ्य असते हा संशोधनाचा विषय असतो. त्याचे पुरावे समोर आले तर मात्र स्वाभाविकच त्यावर पटकन विश्वास बसतो. सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीच गोष्ट लपून राहत नाही असे म्हणतात. याचाच प्रत्यय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला आहे.
माळशिरस येथे झालेल्या पंतप्रधानांच्या सभेला पैसे देऊन जमवलेली गर्दी सध्या माढा मतदार संघात चर्चेचा विषय ठरली आहे. तसे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्याने व पंतप्रधानांचे भाषण चालू असतानाच लोकांनी “काढता पाय” घेतल्यामुळे त्यामधे तथ्य असल्याची खात्री पटत असल्याचे बोलले जावू लागले आहे.
शिवाय “यळकोट यळकोट जय मल्हार” च्या घोषणा, पिवळा फेटा आणि धनगरी वेशभूषेतील वस्त्र व बोधचिन्ह हातात घेऊन पंतप्रधानांनी धनगर समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी धनगर आरक्षण बाबत ब्र शब्दही काढला नाही. त्यामुळे धनगर समाजात संतापाची तीव्र लाट असल्याची पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे दोन पक्ष फोडून सत्ता मिळवलेले व आता कारवाई ची भीती दाखवून माढा मतदारसंघातील विरोधकांना आपले काम करण्यास भाग पडण्याचा केविलवाणा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यातील राजकीय कारकिर्दी वरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.
मतदारांना गृहीत धरून केवळ नेत्यांनाच (काहींना भीती दाखवून तर काहींना लक्ष्मी दर्शन घडवून) अप्रत्यक्ष जबरदस्ती करत भाजपचे काम करायला लावायचे हे न समजायला जनता काय दूध खुळी आहे का? असा सवाल सध्या नागरिक विचारू लागले आहेत.
भाजपा नेत्यांच्या या कृत्यामुळे त्यांचा माढा व सोलापूर मधील उमेदवार अधिकच अडचणीत आला असून त्यांचा पराभव निश्चित असल्याची भावना युट्युब वर वार्तांकन करणाऱ्या व लोकांच्या मुलाखती घेणाऱ्या पत्रकारांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज