टीम मंगळवेढा टाईम्स।
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक असल्याचे सांगून तरुणीशी विवाह केला. विवाहानंतर दहा लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी मानसिक तसेच अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यासाठी छळ केल्याप्रकरणी
पती, सासू, सासरे, दीर, नणंद, नंदावा यांच्यासह सात जणांविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाल्मीक वाघ (पती), सुमन वाघ (सासू), जगन्नाथ वाघ (सासरा), मनिषा मस्के (नणंद), प्रदिप मस्के (नंदावा), भगवान वाघ (दीर), प्रिया मोरे (वाल्मीकची पत्नी, सर्व रा. रानाळे, ता. मालेगाव, जि. नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली असून ही घटना २४ फेब्रुवारी २०२३ ते ६ डिसेंबरदरम्यान घडली.
बार्शीच्या तरुणीची पुण्यामध्ये खासगी नोकरी करीत असताना वाल्मीक वाघ याची भेट झाली. त्याने मी लाचलुचपत विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि कोथरूड येथील स्वामी समर्थ फायनान्स कंपनीत असल्याचे सांगितले.
त्याने मला नोकरीही दुसऱ्या ठिकाणी मिळवून दिली. त्यामुळे विश्वास वाढला आणि आमचा दररोज संपर्क वाढत गेला. तू मला खूप आवडतेस, तू जर माझ्याशी विवाह केला नाही तर मी डोक्यात गोळी मारुन घेऊन जीव देईन, अशी धमकी त्याने दिली.
मग आम्ही त्याच्या कुटुंबाला भेटलो, तेव्हा सर्वांनी मुलगा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२३ रोजी गणपतीपुळे येथे विवाह केला.
विवाहानंतर माहेरहून दहा लाख रुपये आण म्हणून पती वाल्मीकने छळ सुरू केला. तसेच अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडू लागल्याने कुटुंबाला सांगितले तर कुटुंबानेही पैसे आण, असे सांगितले.
तसेच प्रिया कोण आहे? असे विचारले असता वाल्मीकने मित्राची पत्नी असून तो मयत झाला आहे. त्याच्या मुलांनाही मी सांभाळीन, असा शब्द दिला असल्याचे सांगितले.
प्रत्यक्षात पुणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चौकशी केली असता वाल्मीक नोकरीला नाही. तसेच त्याचा विवाह झालेला असल्याचे समजले.
त्याने दुसरा विवाह करून फसवणूक केली व मानसिक छळ केला, असे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज