टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत बाळूमामांचे भक्त मनोहरमामा भोसले गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. बाळूमामांचे वंशज असल्याचे सांगून भक्तांकडून पैसे उकळल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे.
मनोहरमामा भोसले कोण आहेत?
मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले हे सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील उंदरगाव या गावातील २८ वर्षीय युवक आहेत. त्यांनी ज्योतिषाचार्याची पदवी घेतली आहे.
उंदरगावमध्ये त्यांनी स्वतः एक अध्यात्मिक मठ व बाळूमामा यांचे मंदिर देखील उभारले आहे. (सध्या या मंदिराला कुलूप लावण्यात आले आहे) या मठाच्या माध्यमातून संत बाळूमामा यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचा दावा ते करतात.
मनोहर भोसले यांना संत बाळूमामा प्रसन्न असून बाळूमामांचे वंशज असल्याची चर्चा देखील उठली होती. मात्र, मनोहर भोसले यांनी आपण संत बाळूमामा यांचे वंशज असल्याच्या चर्चेचे खंडन केले असून त्यांचे केवळ भक्त असल्याचे स्पष्ट केले आहे.
आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांचे प्रश्न मार्गी लावत असल्याचा त्यांचा दावा होता.
मनोहरमामांच्या उंदीरगावातील मठात गेल्या काही कालावधीपासून मोठ्या प्रमाणात भक्त व समस्यांनी ग्रासलेल्या लोकांची गर्दी वाढू लागली होती. अनेक राजकीय मंडळी, कला, क्रीडा व्यावसायिक इत्यादी क्षेत्रासह, इतर सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे समस्या घेऊन जात व मनोहर भोसले त्यांच्या समस्यांचे निराकरण करत होते.
यातूनच त्यांच्या मठात गर्दी होऊ लागली व अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी होऊ लागली.
दर अमावस्या व पौर्णिमेला उंदीरगावातील बाळूमामा मंदिरात भक्तांची अफाट गर्दी होऊ लागली. राज्यातील विविध भागातून तसेच सोलापूर जिल्ह्याला लागूनच असलेल्या कर्नाटक राज्यातून देखील त्यांच्याकडे लोक येऊ लागले.
कलर्स वाहिनीवरील संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित मालिकेला त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर त्यांचे महत्व अधिकच वाढल्याचे दिसून येते.
त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात देणग्या प्राप्त होऊ लागल्या. मात्र, त्यांना प्राप्त होणारे हे दान व देणग्या याचा उपयोग ते स्वतः न करता समाजोपयोगी कामांसाठी करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सर्व देणग्या या त्यांच्या शिवसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट ला जमा होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कोणी केला पैसे उकाळल्याचा आरोप?
संत बाळूमामा यांची समाधी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या गावातून मनोहरमामा यांच्यावर आरोप झाले व बाळुमामा आणि मनोहरमामा हा मुद्दा चर्चेला आला.
अदमापूरमध्ये सद्गुरू बाळूमामा देवस्थान आहे. आदमापूर ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी मनोहरमामा यांच्या विरोधात निषेधाचा एक ठराव पारित केला. यामध्ये बाळूमामा यांचे वारस असल्याचे सांगून मनोहर भोसले हे लोकांना लुबाडत असून भक्तांकडून पैसे उकाळात असल्याचा थेट आरोप आदमापूरच्या सरपंचांनी केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती.
आदमापूरमधील या ठरावाला बाळूमामा देवालयानेही जाहीर पाठिंबा दिला व तेव्हापासूनच मनोहर भोसले राज्यभरात वादाचा विषय ठरले.
सध्या मनोहर मामा यांच्या उंदरगावातील मठाला व बाळूमामा यांच्या मंदिराला कुलूप असून मनोहर भोसले गायब झाल्याचा चर्चा देखील रंगल्या आहेत. मात्र, माझ्या परिवारातील सदस्य उंदरगावात असून मी गायब झाल्याच्या चर्चा व्यर्थ असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी साम वाहिनीला प्रतिक्रिया देत केली.
आदमापुरच्या ग्रामस्थांच्या आरोपांची राळ कमी होण्याआधीच मनोहर भोसले यांच्या नातेवाईकांनी देखील पैसे उकाळल्याचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. त्यामुळे मनोहर भोसले यांच्या अडचणी अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बदनामी करणा-यांविरुद्ध १०० कोटींचा खटला दाखल करणार : मनोहरमामा
काही जण माझ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागत आहेत. पैसे दिले नाही तर, तुमचा आसाराम बापू करू. त्याचे चित्र तुम्हाला दोन ते तीन दिवसात दिसेल, अशी धमकी मला दिली जात आहे.
माझ्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले जात आहे. त्यामुळे बदनामी करणा-याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहाणीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती बाळूमामांचे भक्त मनोहर चंद्रकांत भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर भोसले यांच्याविरुद्ध भक्तांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे.
भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडण केले. त्यांचे वकील रूपाली ठोंबरे-पाटील आणि ॲड. विजय ठोंबरे यावेळी उपस्थित होते.
मी कोणाचाही अवतार, बाबा किंवा महाराज नाही. मी केवळ बाळूमामांचा भक्त म्हणून त्यांची सेवा करत आहे. माझ्या वैयक्तिक श्रद्धेतून मी बाळूमामांचे मंदिर उभारले आहे. तेथे दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या गाड्या पार्क करण्यावरून काही स्थानिक लोकांमध्ये रोष आहे.
त्यामुळे मी भक्तांकडून पैसे उकळतो, असा आरोप माझ्यावर होत आहेत. मात्र मी कोणत्याही व्यक्तीस एकही रुपयांची मागणी केली नाही. तेथे आलेले भक्तगण हे त्यांचे स्वच्छेने शिवसिद्ध संचालित संस्थेकडे देणगी देतात. ही देणगी केवळ मंदिर बांधकाम तसेच भक्त निवासासाठी वापरली जाते, असे भोसले यांनी सांगितले.
माझा फोटो काढायचा की ठेवायचा हे निर्माते ठरवतील
बाळुमामा यांच्यावरील मालिकेबाबत भोसले म्हणाले, ‘बाळूमामांचे कार्य घराघरांत जावे, या हेतूने या मालिकेसाठी कथा पुरविली आहे. त्याच्या रजिस्टेशनसाठी मनोहर मामा हाय लँड एलएलपी ही कंपनी स्थापन केली आहे. त्यात कोणताही व्यवहार झालेला नाही.
आता मालिकेच्या सुरवातीला दाखविला जाणारा माझा फोटो काढायचा की ठेवायचा हा निर्मात्याचा प्रश्न आहे. आमची धार्मिक वृत्ती काहींना पटली नसल्याने त्यांनी मला व भक्तांकडे खंडणी मागितली आहे.
मी त्यांना खंडणी न दिल्यास ते माझ्यावर व भक्तांवर खोटेनाटे आरोप करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचे भोसले यांनी सांगितले.(स्रोत:साम टीव्ही&सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज