टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज शनिवारी संपत आहे. तब्बल ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून त्यापैकी कोण-कोण माघार घेणार? आणि कोण रिंगणात राहणार? यासह लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीचे आ.भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा सामान्य जनतेला होती. अपेक्षेनुसार महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली.
याचवेळी विरोधी भाजपाने या जागेसाठी जोर लावला असून पंढरपुरातील परिचारक गटाला शांत बसवत मंगळवेढ्यातील उद्योजक समाधान आवताडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. दोन गटांना एकत्र आणल्यामुळे निवडणूक गाजणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
दरम्यान, या दोन प्रमुख उमेदवारांसह शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे, ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवत उमेदवारी दाखल केली आहे. त्याचबरोबर समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनीही निवडणूक लढविण्याचा निर्धार करीत प्रचार सुरू केला आहे.
त्यांचा अर्ज मागे घेतला जावा, यासाठी गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील भाजपाची मातब्बर मंडळी प्रयत्न करीत आहेत. मात्र , यश आले नसल्याचेच चित्र शुक्रवारी रात्रीपर्यंत कायम होते.
यासह पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनीही अर्ज दाखल करून राजकीय क्षेत्राला आणखी बुचकळ्यात टाकले आहे. ‘बळीराजा ‘ संघटनेचे मोहन हळणवर यांचाही उमेदवारी अर्ज कायम आहे. यासह इतरही अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
आज शनिवारी हा अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून अधिकाधिक अपक्षांनी माघार घ्यावी यासाठी प्रमुख राजकीय मंडळी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये कितपत यश येणार कोण-कोण मागे घेणार? आणि कोण-कोण लढणार ? हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज