टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 23 मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
एरवी गर्दी, गोंधळ आणि जल्लोषात पार पडणार्या निवडणुकीवर कोरोना आणि आचारसंहितेचा प्रभाव दिसून येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी दोन व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. पंढरपूर विधानसभेसाठी जवळपास 524 केंद्रांवर मतदान होणार आहे.
त्यासाठी 1210 आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचार्यांच्या नेमणुका केल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर मतदारांचा ताप मोजण्यासाठी 550 थर्मल गन ठेवण्यात आल्या आहेत.
4 हजार 500 फेसशिल्ड पोलिस आणि आरोग्य कर्मचारी तसेच निवडणूक कर्मचार्यांना देण्यात येणार आहेत. 4 हजार 500 हँडग्लोज देण्यात येणार आहेत. जवळपास 5000 मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
गरजेनुसार आवश्यक तेवढे सॅनिटायझर पुरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.
निवडणुकीमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार आहे. 3 हजार 150 मतदान कर्मचारी, तर 60 विभागीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी 550 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्रचार सभा आणि प्रचार फेर्यांवर गर्दीसाठी निर्बंध घालण्यात येणार असून त्यासाठीच्या मार्गदर्शन सूचना लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले आहे.
मोजक्या लोकामंध्ये सभा घेण्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. जर कोणी शासनाच्या नियम व अटींचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
मतमोजणी निवडणूक कार्यालय पंढरपुरातच
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन गुरव यांची नेमणूक करण्यात आली आहे. या निवडणुकीचे कार्यालय पंढरपूर शहरातच असणार असून मतमोजणी पंढरपूर शहरात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज