मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा बसस्थानक पुन्हा एकदा चोरट्यांचे आगार बनले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित बनला असून पोलिस मात्र केवळ “तपास सुरू आहे” या शब्दांवर नागरिकांना गप्प बसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नुकतेच एका ७७ वर्षीय निराधार वृद्ध महिलेला चोरट्यांनी बसमध्ये चढतानाच लुटले. या महिलेच्या गळ्यातील तब्बल ६० हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र क्षणार्धात गायब झाले.

वृद्ध महिला मालन जगन्नाथ रणदिवे (रा. बोराळे) या आपल्या मुलीकडे सोलापूर येथे गेल्या होत्या. परतताना मंगळवेढा बसस्थानकावर सायंकाळी ५ वाजता बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचे मंगळसूत्र खेचून नेले.

बस सुरू झाल्यावर गळ्यातील मणी गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी नातवाला फोन करून घटनेची माहिती दिली.

नातवाने आजीसह मंगळवेढा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. मात्र स्थानिक प्रवाशांचा संताप असा की, चोर सापडत नाही, पण पोलिस फक्त डायरीत आकडे वाढवतात.

बसस्थानक’ म्हणजे ‘चोरांचा अड्डा’?
गेल्या काही महिन्यांपासून मंगळवेढा बसस्थानकावर चोरीचे सत्र सुरुच आहे. मोबाईल, पर्स, दागिने अशा चोरीच्या अनेक तक्रारी असून तपास मात्र शून्यावरच आहे.

धक्कादायक बाब म्हणजे याच बसस्थानकावर एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीची पाच लाख रुपये किमतीच्या दागिन्याची पर्स चोरली गेली होती. त्या घटनेलाही वर्ष उलटून गेले, तरी पोलिसांना चोरट्यांचा मागमूस लागलेला नाही.

पोलिसांचे लक्ष जनतेवर की चोरट्यांवर ?
या सततच्या अपयशामुळे नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांकडून प्रश्न विचारला जात आहे की, “जेव्हा पोलिसांच्या घरातील चोरीचा तपास लागत नाही, तेव्हा सामान्य जनतेच्या हक्कांचा न्याय कोण देणार?”

प्रवाशांचा संताप वाढत असून पोलिसांनी तत्काळ गस्त वाढवून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, अशी मागणी होत आहे. अन्यथा बसस्थानकावरील या चोरीच्या मालिकेविरुद्ध जनतेचा राग रस्त्यावर उतरेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










