टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा विक्रेत्याला किंवा बारचालकाला २५ हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. शिवाय कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.
दरम्यान, परवाना नसताना दारूचा साठा केलेल्या बारचालक व विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध पथके तैनात केली असून ही पथके बार, विक्रेत्यांवर, ढाब्यावर अचानक धाडी टाकून कारवाई करीत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त, अंमली पदार्थावर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो, तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागामार्फत केले जाते.
दरम्यान, मार्कयुक्त पदार्थांची निर्मिती / वाहतूक / विक्री / बाळगणे / आयात / निर्यात / इत्यादीसाठी विविध अनुज्ञप्ती / परवाने मंजूर करून साध्य करण्यात येते.
हॉटेल, ढाब्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने इतर ठिकाणी देशी, विदेशी दारू विक्री व वाहतुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या दहा महिन्यात ३८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अटक आरोपींची संख्या ३९१ तर जप्त मुद्देमालाची किंमत ७६ लाख ८९ हजार इतकी आहे.
सव्वा लाखाचा दंड
■ ढाबे व हॉटेलवरील कारवाईत आतापर्यंत सव्वा लाखापर्यंत दंड आकारण्यात आला आहे. हॉटेल चालकाला २५ हजार तर दारू पिणाऱ्यांना १ हजार रुपये दंड • आकारण्यात येतो. त्यामुळे परवाना काढूनच दारू प्या अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.
परवाना कोठे मिळतो?
बार विक्रेत्याला दारू विकण्याचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिला जातो. शिवाय दारू पिणाऱ्या लोकांनाही परवाना दिला जातो. तो दिवसाचा किंवा वार्षिक असा आहे. यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयास भेट द्यावी असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
हातभट्टी दारू निर्मिती करणारेही रडारवर
जिल्ह्यात हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येते. हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीचे एकूण गुन्हे- ६७७ तर या प्रकरणात अटक आरोपींची संख्या ४५८ एवढी आहे. जप्त मुद्देमालाची किंमत दोन कोटी १६ लाख इतकी आहे.
१९३२ जणांवर कारवाई, १४१ जणांना अटक
मागील दहा महिन्यात एकूण धाबे / हॉटेलवर नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या १३२ एवढी असून अटक आरोपीची संख्या १४१ एवढी आहे. या कारवाईत जप्त मुद्देमालाची किंमत ४ लाख ४५ हजार एवढी आहे.(स्रोत:लोकमत)
बार, ढाब्यावर विनापरवाना दारू पिणाऱ्या लोकांवर कारवाई सातत्याने सुरु आहे. यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. बार, ढाब्यावर दारू पित असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करून दही करण्यात येत आहे. त्यामुळे रितसर परवाना घेऊनच दारू प्या अन्यथा कारवाईला सामोरे जा. -नितीन धार्मिक, पोलीस अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर,
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज