टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकऱ्यांचा विकास हेच ब्रीद डोळ्यासमोर ठेवून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी नाबार्ड आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या सहकार्यातून लक्ष्मी कृषी विकास प्रोडूसर कंपनी आणि समाजसेवक प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना सेवा देत आहे.
या उपक्रमामुळे गावागावातील बेकारीला आळा बसला असून शेतकरी गावकीच्या राजकारणाला फाटा देऊन स्वतःचा विकास व प्रगती करीत आहेत. परंतु शेतकऱ्यांची दिशाभूल करून स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या समाजकंटकांना लक्ष्मी कृषी विकास कंपनी धडा शिकवेल आणि त्यासाठीच प्रजासत्ताक दिनी या प्रवृत्तीच्या विरोधात दोन हजार सभासदांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा इशारा या कंपनीचे व्यवस्थापक विवेकानंद खिलारे यांनी श्रमिक पत्रकार संघात बोलताना दिला.
श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना खिलारे म्हणाले की शेतकरी बांधवांना अर्थपुरवठा आणि त्यांच्या दारात गाय देण्यापर्यंत कंपनी आणि आमचे ट्रस्ट काम करत आहे.
परंतु ‘सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही’ याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना विरोध होतोच तसाच प्रकार सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांची प्रगती झाली तर तो आपले उंब्रे झिजवत जगणार नाही.
त्यामुळे त्याची प्रगती होऊ नये यासाठी काहीजण कूटनीतीचा डाव टाकून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत तो डाव आम्ही हाणून पाडण्यात यशस्वी होत आहोत.
आमची कंपनी शेतकरी विकासाला चालना देणारी आणि विशेषता महिला उद्योजकांनी सुरू केलेली कंपनी असून ही कंपनी बंद पाडण्यासाठी सध्या काही विघ्नसंतोषी मंडळी जोरदार प्रयत्न करीत आहेत.
शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या कंपनीला या समाजकंटकांनी हाणामारी आणि घातपात करण्याची सुद्धा धमकी दिल्याने आम्ही हा प्रकार जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविला आहे.
वास्तविक पाहता विरोधक समाजकंटकांचा शेतकऱ्यांची काहीही काडीमात्र संबंध नाही जाणून-बुजून खोट्या तक्रारी करून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याची ची खोटी कातडी पांघरून कंपनी आणि ट्रस्ट विरोधात कटकारस्थान करत आहेत ते लोक महिला कंपनी बंद करू पाहत आहेत.
या समूह गटाचे काही लोकांनी कर्ज भरली नाहीत थकीत ठेवली किंवा गावी परस्पर विकल्या ते लोक या समाजकंटकांना हाताशी धरून कंपनीची आणि प्रामाणिक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये या मंडळींचा आर्थिक स्वार्थ लपलेला असून या समाजकंटकांनी कंपनी आणि ट्रस्टला पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ पाहिला जात आहे.
अधिक माहिती देताना सी ई ओ तुळशीदास करांडे म्हणाले की शेतकरी संघटना कर्जमाफी मिळवून देऊ असे आमिष काही शेतकऱ्यांना त्यांनी दाखवले त्याला सुद्धा शेतकऱ्यांनी बळी पडले नाहीत. यात महिला प्रोड्युसर कंपनी बंद पडावी हा त्या समाजकंटकांचा एककलमी कार्यक्रम आहे.
तसे झाल्यावर केवळ शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे आणि या पुढारी लोकांचा स्वार्थ साधला जाणार आहे त्यामुळे या षडयंत्र विरुद्ध आता शेतकऱ्यांनीच आवाज उठवून हा लढा अधिक तीव्र करणे काळाची गरज आहे.
ब्लॅकमेलर टोळीचा बंदोबस्त व्हावा म्हणून शेतकरी समूह गटांनी जिल्हाधिकारी यांना तातडीने दोन हजार समूहगट सभासदांचे उपस्थित भेट घेऊन घटनेचे विस्तृत निवेदन दिलेले आहे आणि मूक मोर्चासाठी कायदेशीर परवानगी मागितली आहे.
आम्ही प्रमाणिक आणि सचोटीने काम करून शेतकरी हित साधण्यासाठी जीवापाड मेहनत करत आहोत. आमचा गैरकारभार आहे असे समाजकंटकांनी न्यायालयात किंवा जनतेसमोर सिद्ध केल्यास आम्ही आमची कंपनी कायमचे बंद करू. आम्ही शेतकरी सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय ठेवले आहे
आम्ही कोणतीही समाजविघातक प्रवृत्ती समोर झुकणार नाही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. शेतकरी हितामध्ये तडजोड करणार नाही. अशी गरज पडल्यास कंपनी व सर्व उपक्रम बंद करू परंतु कोणतेही समाजविघातक प्रवृत्तींना बेकायदेशीर गैरमार्गाने एक रुपयाची खंडणी आम्ही देणार नाही असा गर्भित इशारा या कंपनीने दिलाय.
या पत्रकार परिषदेला सीईओ तुळशीदास करंडे, विवेकानंद खिलारे, संचालक अर्चना खराडे, राधिका करंडे, शकुंतला नरळे, सुवर्णा गंगणमळे, सुरेखा नरळे आदी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज