टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बठाण गावातील स्नेहल भास्कर घोडके. गावची लोकसंख्या जेमतेम एक हजारच्या आसपास. शिक्षण घेतच तिने भारतीय सीमा सुरक्षा दलात यश संपादन केलं आहे.
सैन्य दलात रुजू होणारी ती गावातील पहिलीच मुलगी. आई उषा शिवणकाम करून कुटुंब चालवते. दोन मुली आणि एक मुलगा इतक्याच लहानशा कुटुंबाची जबाबदारी आई एकटी सांभाळतीय.
लहानपणापासून आर्मी जवानांना पाहून आपल्यालाही देशसेवा करायची आहे, हे स्वप्न तिने बाळगले. घरचे काम करत अन् शिक्षण पूर्ण करत तिने हे यश मिळवले आहे.
मनापासून जिद्द ठेवली तर कितीही अडचणी आल्या तरी सारं काही मिळवू शकतो, हेच दाखवून तिने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. देशाचं रक्षण करण्यासाठी ती तयार झाली आहे.
स्नेहल पाचवीचे शिक्षण घेत असतानाच वडिलांचे छत्र हरपले. कुटुंबाचा डोलारा आणि आयुष्याची चालढकल करत आईचं कष्ट सुरू आहे.
आपण शिकून काहीतरी करून दाखवायचं, हीच जिद्द मनात ठेवून स्नेहलने जेमतेम परिस्थितीतही कमालच करून दाखवली.
अलीकडे शासकीय नोकरी मिळवणं कठीणच. पण, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तरुणाई मागे हटायला तयार नाही. स्नेहल या तरुणीवर तिच्या गावात कौतुकांचा वर्षाव होत आहे.
घोडके कुटुंबातील स्नेहल ही मोठी मुलगी. तिची लहान बहीण ऋतुजा बीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असून लहान भाऊ सोहम दहावीत आहे.
घरची तीन एकर बागायती शेती आहे पण ती शेती दुसऱ्यांना सांभाळायला दिली आहे. तिच्यातील शिक्षणाची गोडी बघून आईने तिला पुढे शिकवण्याचा निर्धार केला.
स्नेहलचे सातवीपर्यंतचे शिक्षण मंगळवेढ्यामध्ये झाले. पाचवीत असताना वडील गेल्यामुळे ती आणि तिचे कुटुंब दोन वर्षांनी पंढरपूरमध्ये राहायला गेले. सध्या पुढील शिक्षण पंढरपूरमध्ये करत आहे.
सध्या ती बीएस्सीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. काम करत, शिक्षण घेत तिने अभ्यास केला. घरची परिस्थिती बदलण्यासाठी तिने भरतीचे स्वप्न मनात ठेवून कष्ट करायला सुरवात केली.
स्नेहलने दहावीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली. तिचे सख्खे मामा पीएसआय असल्यामुळे तिला त्यांच्याकडून अभ्यासाची खूप मदत मिळाली. सुरवातीला तिच्या मामाने तिला काही पुस्तके अभ्यास करण्यासाठी दिली.
तेव्हापासून तिला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मामांनी खूप मार्गदर्शन केले. आईची मदत आणि मामांचे मार्गदर्शन यामुळे साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या. गावातील काहींचा तिला अभ्यास करण्यासाठी विरोध होता. मोठी मुलगी आहे, लवकर लग्न करून दिल्या घरी पाठवा असे बोलायचे. या साऱ्यांना तोंड देत आईने स्नेहलला शिकवले.
अशातच 2018-19 ला स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जागा निघाल्या. त्या वेळी तिने फॉर्म भरून अभ्यासाचे नियोजन करीत परीक्षा दिली. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात ती भारतीय सीमा सुरक्षा दलात उत्तीर्ण झाली.
कोरोना महामारीमुळे या परीक्षेचा निकाल उशिरा लागला. म्हणजेच जानेवारी 2021 ला निकाल जाहीर झाला. आणि या परीक्षेत तिने यश संपादन केले. इतक्या लहानशा 21 वर्षांच्या स्नेहलने भारतीय सैन्य दलात यश मिळवले. स्नेहलचे पहिल्याच प्रयत्नात देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तिच्या या यशाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
या यशाबाबत स्नेहल घोडके म्हणाली, लहानपणापासून आर्मी जवानांना पाहून आपणही देशसेवा करावी, हे जे स्वप्न पाहिलं ते मी पूर्ण केलंय. याचे सारे श्रेय माझ्या आईला जाते.
आईच्या कष्टाचे सार्थक झाले, याचा खूप आनंद होतो आहे. मला सैन्य दलात काम करण्याची संधी मिळतीय, त्याचा सदुपयोग करून इतर मुलींना प्रेरणा देईन. मनात जिद्द आणि कष्ट करण्याची चिकाटी असेल तर साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात.(सकाळ)



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











