टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात सचिन वाझेंसोबत पाच ऑफिसर निलंबित झाले, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर जेलमध्ये जाण्याची पाळी आली, परमबीर सिंग घरी गेले. अनिल परब, अनिल देशमुख यांच्या नंतर जितेंद्र आव्हाड हे आता लाईनीत आहेत. त्यामुळं आगे आगे देखो होता हैं क्या असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका केली.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या हे सोलापूर दौर्यावर आहेत. सकाळी त्यांनी शासकीय रूग्णालय व मार्कडेय रूग्णालयास भेट देत तेथील रूग्णांची संवाद साधला. शिवाय प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावाही घेतला.
यावेळी त्यांच्यासाेबत महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेता शिवानंद पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख व अन्य भाजप नेते, नगरसेवक, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, शिवसेना नेते प्रताप सरनाईक हे फरार आहेत, संजय राऊतांना तोडीचे 55 लाख रुपये परत द्यावे लागलेत. मुंबईच्या महापौरांनी एसआरएचे गाळे ढापले आहेत हे हायकोर्टात सिद्ध झालं आहे असेही सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हे सरकार पाच वर्ष टिकावं मात्र जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारचे अर्धा डझन मंत्री आणि अर्धा डझन नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम भाजपकडून मी करणारं आहे असं ही सोमय्या यावेळी म्हणाले आहेत.
ठाकरे सरकारने कोविड मृत्युची माहिती लपवली
उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील कोव्हिड मृत्यूंची माहिती लपवली आहे. त्यामुळे भाजप येत्या काळात महाराष्ट्रातील कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तेरा महत्त्वाच्या शहरांमध्ये माझ्यासह किरीट आणखी दोन सीए मिळून हे ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
किरीट सोमय्या म्हणाले की, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही माहिती आहे की, भारतात लसींचे उत्पादन दोन कंपन्या करतात आणि त्यातील महत्त्वाची कंपनी ही पुण्यात असून, त्याचे मालक हे शरद पवारांचे मित्र आहेत.
लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन वर्षात 10 कोटी होत असेल तर देशातील सर्व लोकांना लस मिळायला बारा महिने लागणार आहेत. दरम्यान, एप्रिल महिन्यात जे मृत्युकांड महाराष्ट्रात झालं आहे त्याचा आणि लसीचा काय संबंध आहे, असा प्रश्नही सोमय्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर येत्या 31 डिसेंबरपर्यंत भारतात अडीचशे कोटी लसी येणार आहेत. त्यातील सव्वादोनशे कोटी लसी भारतात बनवल्या जाणार आहेत, तर पंचवीस कोटी लसी इंपोर्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येक भारतीयांच लसीकरण झालेलं असेल, असंही किरीट सोमय्या या वेळी म्हणाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज