टीम मंगळवेढा टाईम्स ।
अनलॉक उठविण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना नव्हे तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आहेत, असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आजवर ठणकावून सांगितले.
मात्र, रविवारी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील बैठकीचा दाखला देत सोलापुरातील निर्बंध आपण दोन दिवसांत शिथिल करू अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे पालकमंत्र्यांचा “गोड बोल पण रेटून बोल’ हा स्वभाव समोर आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 14 एप्रिलपासून राज्यभर कडक निर्बंध लागू झाले. मे महिन्यानंतर टप्प्या- टप्प्याने निर्बंध शिथिलतेचा निर्णय झाला.
मात्र, जुलैमध्ये डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला. सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत दुकाने सुरू ठेवणे आणि दर शनिवारी व रविवारी दुकाने बंद राहतील, असा तो निर्णय होता.
ज्या शहर-जिल्ह्यात रुग्णवाढ सर्वाधिक आहे, त्या ठिकाणी असे निर्बंध लागू झाले. 22 जिल्ह्यांमधील निर्बंध मागील काही दिवसांपूर्वी शिथिल झाले. मात्र, उर्वरित 14 जिल्ह्यांच्या यादीत पुणे, कोल्हापूर, सोलापूर शहर – ग्रामीणचा समावेश आहे.
मार्च 2020 पासून पूर्णवेळ सातत्याने दुकाने तथा व्यवसाय सुरू न राहिल्याने व्यापारी, उद्योजक, लहान-मोठे व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढू लागला असून मुलांचे शैक्षणिक प्रश्नही वाढले आहेत.
सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळत नाही. हातावरील पोट असलेल्यांना दोनवेळचे पोटभर जेवण मिळत नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. तरीही, निर्बंध उठविण्यासंदर्भात पालकमंत्री ठोस भूमिका घेत नसल्याचे दुर्दैवच.
सोलापूर शहराच्या तुलनेत पुणे शहरातील कोरोनाची रुग्णवाढ मोठी असतानाही पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बैठक घेऊन दणक्यात निर्बंध शिथिलतेची घोषणा केली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जागृत झाले आणि त्यांनीही सोलापूर शहरातील निर्बंध शिथिलतेची भाषा सुरू केली.
मात्र, अजूनपर्यंत ठोस निर्णय झालाच नाही, हे विशेष. पुण्याचे पालकमंत्री निर्णय घेऊ शकतात, मग तुम्ही का नाही, असा प्रश्न व्यापारी विचारू लागले आहेत.
निर्बंध शिथिलतेसाठी पालकमंत्र्यांचे योगदान काय?
माझ्यासाठी सोलापूर नव्हे तर इंदापूर महत्त्वाचे असून इंदापूरकरांसाठी मी पालकमंत्रिपद सोडायला तयार आहे, अशी भूमिका दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी घेतली होती. त्यांचे आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये अजूनही एकोपा झाल्याचे दिसत नाही.
आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पोषक वातावरण तयार होण्यासाठी सरकारकडून अधिकाधिक निधी मिळविणे आणि व्यापारी, व्यावसायिक, लघू उद्योजक, सुशिक्षित बेरोजगांरासाठी पालकमंत्र्यांनी सोयीचे निर्णय घेणे अपेक्षित आहे.
मागच्या वेळी शिवसेना नेते माजी आमदार दिलीप माने यांच्यासह काही नगरसेवकांनी व्यापाऱ्यांसोबत आंदोलन केल्यानंतर शहरातील निर्बंध शिथिलतेचा निर्णय झाला. त्या वेळी माझ्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.
आता आंदोलन कोणीही केले नसून काहींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, महापालिका आयुक्तांनी प्रस्ताव पाठवूनही सकारात्मक निर्णय झालाच नाही. त्यामुळे पालकमंत्री निर्बंध शिथिलतेचा निर्णय होण्यासाठी खरोखरच प्रयत्न करतील का, अशी विचारणा होऊ लागली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज