मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
चीटफंड घोटाळ्याचे माहेरघर असलेल्या नाशिक शहरात क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीचा महाघोटाळा समोर आला आहे. गुंतवणुकीतील दरमहाच्या विशिष्ट रकमेसह या योजनेत नवीन लोकांना साखळी पद्धतीने जोडल्यास दलाली आणि कॅम्पमॅक्स येथील सहलीचे आमिष दाखवून भामट्यांनी शेकडो गुंतवणूकदारांना गंडविले आहे.
या आमिषाला बळी पडलेल्या ३८ जणांनी पोलिसांत धाव घेतली असून, त्यांची तब्बल 81 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तक्रारदारांसह फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता अनिल सुरते (रा. पवननगर, सिडको) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. संशयित प्रसाद तडाखे, पवन उबाळे आणि समर्थ जगताप (रा. नाशिक), खुशाल पवार, तसेच ओरीस कॉइन क्रिप्टो करन्सीचे देशातील संचालक, राहुल खुराणा, अविनाश सिंग, रहव ठाकूर आदी सात जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करा, दरमहा पैसे अन् परदेशवारीची संधी
ओरीस क्रिप्टो करन्सीच्या भारतातील संचालकांनी ही गुंतवणुकीची योजना सादर केली होती. त्यानुसार एक लाख 40 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर विविध आमिषे दाखविली गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यात दर महिन्याला पाच हजार रुपये लाभांश, आणखी लोकांना जोडल्यास दलाली आणि कॅम्पमॅक्स येथे सहलीसह अन्य लाभ मिळणार असल्याचे सांगितले गेले. इतकेच नव्हे तर, करन्सी ओरीस कॉइनचे दर जसे वाढतील, तसे तुमचे पैसे वाढतील, असे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला.
81 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक
संशयितांनी श्वेता सुरते आणि त्यांचा भाऊ अजिंक्य सुरते यांना अनुक्रमे एक लाख 40 हजार आणि एक लाख 14 हजार रुपये आणि त्यांच्या 36 परिचित गुंतवणूकदारांना 78 लाख 88 हजार याप्रमाणे एकूण 81 लाख 16 हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडले. काही काळ, बहुतांश गुंतवणूकदारांना परतावा मिळाल्याचे सांगितले जाते. नंतर तो बंद झाला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधितांनी पोलिसांत धाव घेतली. बहुचर्चित इमू पालन, केबीसी, मैत्रेय यांसारख्या चीटफंड कंपन्यांनी नाशकात आपले पाय रोवत अवघ्या राज्यासह परराज्यातही फसवणूक केली होती. त्यापाठोपाठ हा प्रकार समोर आला असून, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज