टीम मंगळवेढा टाईम्स।
सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असल्याचं चित्र सध्या राज्यात आहे. त्यातच परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील एका मराठा समाजाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
शैक्षणिक फी भरु न शकल्यामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. महाविद्यालयात शैक्षणिक शिक्षण घेत असताना घरची हालखीची परिस्थिती होती. त्यामुळे शैक्षणिक फीस भरु न शकल्यामुळे या विद्यार्थ्याने विष प्राशन करत स्वत:चं आयुष्य संपवलं. परमेश्वर चितरे असं या विद्यार्थ्याचं नाव होतं.
काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगरमध्ये त्यांच्या कुटुंबाने एकच टाहो फोडला.
सुनील कावळे यांनी 18 ऑक्टोबरच्या रात्री BKC येथील उड्डाणपुलावरील लोखंडी खांबला गळफास घेतला. दरम्यान त्यांनी देखील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं.
नेमकं काय घडलं?
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील दौडगाव येथे विठ्ठल चितरे वास्तव्यास आहेत. त्यांना पाच मुली आणि दोन मुले आहेत. यातील 17 वर्षीय परमेश्वर चितरे हा संभाजीनगर येथे अकरावी मध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता.
परमेश्वरने शनिवार (21 ऑक्टोबर) रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास स्वत:च्या शेतामध्ये विष प्राशन करुन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने गावात एकच खळबळ माजली. मागील वर्षभरापासून तो संभाजीनगर येथे एका खाजगी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता.
वडिलांकडे त्याने महाविद्यालयाची शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैशाची मागणी केली. वडिलांची हालाखिची परिस्थिती असल्याने सोयाबीनची काढणी झाल्यानंतर फिस भरू असे आश्वासन दिले.
परंतु फीस भरण्यास उशीर होत होता तसेच महाविद्यालयाकडून देखील फी बाबत सारखी विचारणा केली जात होती. त्यामुळे ने तो गावी आला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
‘आरक्षण असते तर…’
माझ्याकडे एकच शेती आहे. मी मोलमजुरी कडून जीवन जगत असून माझ्याकडे पैसे नसल्याने त्याला आपण फीस भरु असं म्हटलं होतं. त्यावेळी त्याने आपल्याला आरक्षण असते तर एवढे पैसे भरावे लागले नसते, असं त्याने दोनदा म्हटलं. अशी प्रतिक्रिया परमेश्वरचे वडिल विठ्ठल चितरे यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेले अल्टिमेटम देखील आता संपत आले आहे. तर या आरक्षणासाठी अनेक जण आपलं आयुष्य संपवत असल्याचं चित्र पुन्हा एकदा उभं राहत आहे. त्यामुळे आता तरी सरकार यावर गांभीर्याने विचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.(स्रोत:ABP माझा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज