टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यांकांना प्रोत्साहन देणारा आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची गोड बातमी दिली. “आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या. त्यात कन्नड, तेलुगु, मल्याळम होत्या.
नव्या भाषेसाठी प्रस्ताव आला. फ्रेम वर्कमध्ये त्या बसल्या आणि त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आता ज्या नव्या भाषा येतील त्यांनाही याच फ्रेमवर्कमध्ये बसवलं जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी वैष्णव यांनी दिली.
महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो : फडणवीस
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस!
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
“हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे.
अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष असतात
1) भाषेचे साहित्ये हे किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
2) भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं लागतं ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
1) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
2) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
3) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
सध्या देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज