टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलिस दलातील सहकारी मित्र पॉझिटिव्ह होऊन दवाखान्यात अॅडमिट झाला. त्याचा गैरफायदा घेत रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मित्राच्या घरात घुसून त्याच्या पत्नीवर पोलिसाने बलात्कार केला.
पोलिस वसाहतीतच गेल्या 23 एप्रिल 2021 रोजी रवी भालेकर (रा. अरविंदधाम पोलिस वसाहत) याने हे कृत्य केले. पण बदनामीच्या भीतीने संबंधितांनी फिर्याद दिली नव्हती. अखेर काल रात्री उशिरा फिर्याद दिल्यानुसार रवी भालेकर याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत फिर्यादीत म्हटले आहे, संबंधित महिलेचा पती आणि रवी भालेकर हे दोघे शहर पोलिस आयुक्तालयात एकत्र काम करतात. त्यामुळे त्यांची मैत्री होती. ते दोघेही आपापल्या पत्नी व मुलांसह अरविंदधाम पोलिस वसाहतीमध्ये राहण्यास आहेत.
रवी हा नेहमी पोलिस मित्राच्या घरी जात असे तसेच त्याच्या पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न करीत असे. पण संबंधित महिला त्यास प्रतिसाद देत नव्हती. एकदा तर रवीने मित्राच्या पत्नीला ‘लव यू’ असा मेसेज पाठविला होता. तसेच जाता-येता मित्राच्या घरासमोर घराच्या खिडकीकडे पाहून हसत असे तसेच पत्नीशी बोलण्याचा, लगट करण्याचा प्रयत्न करीत असे.
एकूणच त्याचे चालचलन ठीक नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे संबंधित महिलेने या सर्व गोष्टी आपल्या पतीला सांगितल्या होत्या व तो मेसेजसुध्दा दाखविला होता. त्यामुळे रवीला याबाबत जाब विचारतो, असे संबंधित महिलेच्या पतीने सांगितले होते.
दरम्यान, गेल्या 23 एप्रिल 2021 रोजी संबंधित महिलेचा पती कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याला पोलिस मुख्यालयातील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले होते. या संधीचा फायदा घेऊन रवी हा त्याच रात्री 12 वाजता संबंधित मित्राच्या घरी गेला व त्याने बेल वाजविली. तेव्हा संबंधित महिलेने कोण आहे, असे विचारले.
त्यावेळी रवी भालेकर तेथे आल्याचे महिलेच्या लक्षात आले. पतीचा मित्र असल्याने तिने दार उघडले. तेव्हा अचानक रवी घरात शिरला आणि त्याने घराचे दार आतून बंद केले. संबंधित महिला काही बोलण्याच्या आतच रवीने तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला खूप आवडतेस, असे म्हणत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.
तिने प्रतिकार करता, तू गोंधळ करू नकोस, त्यामुळे तुझीच बदनाम होईल, असे तिला सुनावले. भेदरलेल्या अवस्थेत आणि असहाय्य असल्याने रवीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण अचानक बाहेरून कडी लागल्याने दार उघडेना. त्यामुळे रवीने खालच्या मजल्यावर असलेल्या एकाला फोन केला. त्याला दार उघडण्यास लाऊन तेथून बाहेर पडला.
या प्रकारानंतर घाबरलेल्या महिलेने आपल्या पतीस फोन केला, पण पतीने फोन उचलला नाही. सकाळी पतीने तिला परत फोन केला. त्यावेळी पतीने तिला तू रात्री फोन केला होतास, मुले रडत होती का, असे तिला विचारवले.
पण तिने तुम्ही घरी आल्यावर काय ते सांगते असे सांगत ती रडू लागली. त्यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पती दवाखान्यातून घरी आला. तेव्हा तिने रात्रीचा घडलेला प्रकार सांगितला. यादरम्यान जावयाला कोरोना झाल्याचे समजल्याने मुलीला भेटण्यासाठी तिचे आई-वडील घरी आले होते. त्यांनासुध्दा ही घटना समजली. परंतु सर्वांनीच अब्रूच्या भीतीपोटी फिर्याद दिली नव्हती.
या घटनेची पोलिस कॉलनीत मात्र चर्चा होती. त्यामुळे घटनेची माहिती समजल्यावर विशेष शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त भाग- 1, फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट, फौजदार देशमाने, महिला फौजदार तळे यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट दिली. परंतु तोपर्यंत संबंधित पोलिसाने पत्नीवर झालेल्या अत्याचाराबद्दल तक्रार केली होती. त्यानुसार पत्नीची फिर्याद घेऊन रवी भालेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज