टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी दुसर्यावेळी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यात तळीरामांची काळजी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील 40 वाईनशॉप, 117 देशी दारू दुकाने, 515 परमीट रूममधून गुरुवार, 22 एप्रिलपासून तळीरामांना घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक राजेंद्र आवळे यांनी दिली.
राज्यात वेगाने वाढणार्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करित आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात आली आहे. शासनाने प्रथम वीकेंड लॉकडाऊन सुरू केला.
त्यावेळी सोमवार ते शुक्रवारपर्यंत लोकांची गर्दी रस्त्यावर होती. पण शनिवार व रविवार या दोन दिवशी रस्त्यावरची लोकांची गर्दी कमी जाणवली. पण त्यानंतर दुसर्या दिवशी लोक पुन्हा रस्त्यावर उतरले.
कोरोना रूग्णांची वाढणारी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. कडक लॉकडाऊन सुरू झाला. पंधरा दिवसांपासून बंद असलेले वाईन शॉप, परमीट रूम, कंन्ट्रीलिकरमधून तळीरामांसाठी घरपोच सेवा सुरू करण्यात आली. ही घरपोच सेवा 22 एप्रिलपासून सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू करण्यात आली आहे. यात ग्राहकांनी दारू पिण्याचा पास व किती दारूच्या बाटल्या, कोणत्या कंपनीच्या याचा उल्लेख करून ग्राहकांना घराचा पत्ता द्यावा लागणार आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या ऑफिसमध्ये जिल्ह्यात जवळपास 101 कर्मचारी काम करतात. यात सोलापुरात मुख्य कार्यालय असून पंढरपूर, अकलूज, सांगोला, कुर्डूवाडी, करमाळा अशा ठिकाणीही राज्य उत्पादन शुल्कची कार्यालये आहेत.
तर सोलापुरात 1 भरारी पथक, नांदणीला चेकपोस्ट आहे. एका पथकामध्ये 1 पोलिस निरीक्षक, 2 फौजदार व कर्मचारी अशा 10 जणांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी घरपोच सेवेवर लक्ष ठेवून असणार आहेत.
दारूच्या पासमधूनही उत्पन्न
ज्यांच्याकडे दारू पिण्याचा पास आहे, अशांनाच घरपोच सेवा मिळणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले. देशी दारू एका दिवसाच्या पाससाठी 2 रूपये आहे. विदेशी दारू पिणार्यांसाठी 5 रूपये आहे. वर्षभराच्या पाससाठी 100 रुपये व आजीवन काळासाठी 1 हजार रुपये.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज