मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
एका मांत्रिक महिलेने पुण्यातील आयटी इंजिनीयरची तब्ब्ल १४ कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. दिपक डोळस नावाचे हे आयटी इंजीनियर वेदिका पंढरपूरकर नावाच्या महिला मांत्रिकाच्या सापळ्यात अडकून आपली आयुष्यभराची कमाई गमाऊन बसलेत.

आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात आणि ते दीपक डोळस यांच्या दोन मुलींना असलेले दुर्धर आजार बरे करतील असं सांगून वेदिका पंढरपूरकर यांनी ही फसवणूक केलीय. त्यासाठी डोळस यांना त्यांच्या पुण्यातीलच नव्हे तर इंगलंडमधील मालमत्ता देखील या मांत्रिक महिलेने विकायला भाग पाडल्यात.
या पैशातून वेदिका पंढरपूरकने पुण्यातील महात्मा सोसायटीत आलिशान बांगला खरेदी केला आहे. तर दुसरीकडे डोळस यांना त्यांच्या मुलींवर उपचार करण्यासाठी देखील पैसे उरलेले नाहीत.
मुलींवर उपचार करण्यासाठी देखील त्यांचाकडे पैसे उरलेले नाहीत
पोटच्या दोन पोरी बऱ्या व्हाव्यात यासाठी मांत्रिक महिलेवर विश्वास ठेवणाऱ्या पुण्यातील डोळस दांपत्यावर आयुष्यभराची कमाई गमावण्याची वेळ आली आहे. आयटी इंजिनियर असलेले दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी अंजली डोळस हे वेदिका पंढरपूरकर या महिला मांत्रिकाच्या नादी लागून आपलं सर्वस्व गमावून बसले आहेत.

आश्चर्य म्हणजे आयटी इंजिनियर असलेले आणि बारा वर्ष इंग्लंडमध्ये वास्तव्य केलेले दीपक डोळस दीपक डोळस या अंधश्रद्धेला बळी पडलेत. आपल्या अंगात शंकर महाराज संचारतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण डोळस दांपत्याच्या दोन मुलींना असलेले जन्मजात आजारपण बरे करू असं सांगत त्यांना १४ कोटींना गंडा घातलाय.
त्यासाठी दीपक डोळस यांना एक एक करत त्यांच्या सगळ्या मालमत्ता ज्यामध्ये इंगलंडमधील त्यांच्या घराचा देखील समावेश आहे, या मांत्रिक महिलेने विकायल्या लावल्या. त्यातून मिळालेले पैसे वेदिका पंढरपूरकरने स्वतःच्या खात्यावर वळते करून घेतले.

त्या पैशातून वेदिका पंढरपूरकरने कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला आहे. तर डोळस दांपत्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. मुलींवर उपचार करण्यासाठी देखील त्यांचाकडे पैसे उरलेले नाहीत. माऊली म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी असा विश्वासघात केल्याचं पाहून डोळस दांपत्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतायत.
या दांपत्याची एका भजनी मंडळाच्या माध्यमातून भोंदू बाबासोबत भेट
इंग्लंडमधील आयटी कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी अंजली यांनी २०१८ मध्ये आपल्या दोन दिव्यांग मुलींचं व्यवस्थित संगोपन करण्याच्या उद्देशाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्य असलेल्या या दांपत्याची एका भजनी मंडळाच्या माध्यमातून राजेंद्र खडके या भोंदू बाबासोबत भेट झाली. या बाबाने वेदिका पंढरपूरकर या त्याच्या शिष्येच्या अंगात शांकर महाराज संचारतात असं सांगून शंकर महाराज तुमच्या मुलींचे आजार बरे करतील असं आश्वासन दिलं.
मात्र त्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमधील सगळे पैसे तुम्हाला वेदिका आणि तिचा नवरा कुणाल याच्या बँक अकाउंटमध्ये पाठवावे लागतील असं सांगितलं. वेदिका पंढरपूरकर यांच्यावर विश्वास ठेऊन आधी डोळस यांच्या खात्यांमधील रक्कम, एलआयसी आणि वेगवगेळ्या योजनांमधील ठेवी, म्युचअल फंडमधील रक्कम, प्रॉव्हिडंट फंडमधील पैसे वेदिका पंढरपूरकर यांच्या खात्यावर वळते करण्यात आले.
त्यानंतर डोळस यांचं इंगलंडमधील घर आणि फार्म हाऊस विकून ते पैसे वेदिका यांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यानंतर दीपक डोळस यांचे पुण्यातील दोन्ही फ्लॅट, गावाकडील घर आणि शेतजमीन विकून ते पैसे वेदिका यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर डोळस यांना त्यांच्या शेवटच्या राहत्या घरावर लोन घ्यायला लावलं आणि ते पैसे देखील वेदिका यांनी ताब्यात घेतले. आज डोळस दांपत्याला आपल्या दोन मुलींसह अक्षरश भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.
आधी भाड्याचं घर नंतर कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला
दीपक डोळस यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून हे पैसे वेदिका पंढरपूरकर यांच्या खात्यावर जमा केलेत. त्याचे सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. पोलिसांकडे त्यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली असून वकिलांमार्फत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. डोळस यांची भेट होण्याआधी वेदिका आणि तिचा पती कुणाल हे एका भाड्याच्या घरात राहत होते.
मात्र डोळस यांच्या पैश्यातून त्यांनी कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला आहे. एबीपी माझाच्या टीमने या बंगल्यात जाऊन वेदिका यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
ज्यांना माउली म्हटलं त्यांनीच घात केला
इतके शिकले – सावरलेले असताना डोळस अंधश्रद्धेला बळी कसे पडले असं विचारलं असता मुलींवरील प्रेमापोटी आपण मांत्रिक महिलेवर विश्वास ठेवत गेलो, ज्यांना माउली म्हटलं त्यांनीच घात केला असं त्यांचं म्हणणंय. आपल्या दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी वेदिका पंढरपूरकर यांनी लुबाडलेले पैसे आपणाला परत मिळावेत अशी मागणी डोळस यांनी पोलिसांकडे अर्ज करून केलीय. डोळस यांच्या तक्रारीनंतर वेदिका पंढरपूरकर यांच्या भूलथापांना बळी पडलेले इतरही भक्तगण समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुणे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
एखादी व्यक्ती साक्षर झाली म्हणजे ती सुशिक्षित होते का? परदेशात राहिली म्हणजे ती व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगते का? दीपक डोळस यांच्याकडे पाहिल्यानंतर या प्रश्नांच उत्तरं दुर्दैवाने नाही असं आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक जर ओळखता नाही आला तर आयुष्य कसं उध्वस्त होतं हे डोळस कुटुंबाकडे पाहून लक्षात येतंय.
पोटच्या पोरी बऱ्या होतील या आशेवर जगणाऱ्या डोळस दांपत्याकडून या चुका झाल्यात त्यांचा त्यांना अतिशय पश्चाताप होतोय. त्यामुळं आता पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडत मांत्रिक महिलेने लुबाडलेले त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी कारवाई करण्याची गरज आहे.(स्रोत; ABP माझा)



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














