मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यात कमालीचा गारठा वाढला असताना, येत्या २७ आणि २८ डिसेंबरला मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह मोठा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये २७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांमध्ये पडेल.
दरम्यान, काही प्रमाणात गारपिटीचीही शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
३० डिसेंबरपासून थंडी वाढणार २९ डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणे वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान परतायला सुरुवात होईल. ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल.
शेतकऱ्यांना इशारा
हवामानाच्या या स्थितीनुसार, शेतीशी निगडित कामांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहनदेखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
२८ डिसेंबरला पूर्ण विदर्भात
२८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील
काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशीदेखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज