टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 18 वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण उद्यापासून केलं जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील लसीकरणाची गती वाढवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं टोपे म्हणाले. त्यामुळे 18 वयापासून पुढील सर्वांनी आपल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर जाऊन कोरोना लस घ्यावी अशी विनंती टोपे यांनी केली आहे.
केंद्र सरकारकडून यापूर्वीच 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्याची घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने लसीच्या तुटवड्यामुळे अद्याप 18 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात नव्हती.
मात्र, आता 18 वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस दिली जाणार आहे. दरम्यान, देशभरात केंद्र सरकार आजपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करणार आहे. कोरोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांकडून लसीचा एकूण 75 टक्के भाग केंद्र सरकार खरेदी करणार आहे.
या लसी केंद्राकडून राज्य सरकारांना पाठवल्या जाणार आहे. तर 25 टक्के लसीचे डोस खासगी रुग्णालये थेट उत्पादकांकडून विकत घेऊ शकणार आहेत. तशी परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज