टीम मंगळवेढा टाईम्स ।
नुसत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील चुरस आणि विजयासाठी केलेला संकल्प कुणाला काय करायला लावेल, याचा अंदाज करणे कठीण आहे.
अशाच चुरशीत विठ्ठलाला साकडे घालून केलेला पण पंढरपूर तालुक्यातील सुपली येथील एका ग्रामस्थाने पूर्ण केला आहे.सुपली ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा सत्तांतर झाले आहे. येथे बी. वाय. ऍग्रो प्रणीत हनुमान ग्रामविकास पॅनेल विजयी झाला आहे.
पॅनेल विजयी झाल्यानंतर वामन कुलकर्णी या तरुणाने पंढरीच्या पांडुरंगाच्या दारापर्यंत दंडवत घालून हा पण पूर्ण केला.सुपली ग्रामपंचायतीवर परिचारक गटाची गेल्या दहा वर्षांपासून सत्ता आहे. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडून यावे यासाठी वामन कुलकर्णी यांनी पायात चप्पल न घालण्याचा पण केला होता.
या निवडणुकीत सत्तांतर झाले तर विठ्ठल मंदिरापर्यंत दंडवत घालण्याचा संकल्प केला होता. काल निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या निवडणुकीत बी. वाय. ऍग्रोचे बाळासाहेब यलमार यांच्या हनुमान ग्रामविकास पॅनेलने नऊच्या नऊ जागा जिंकल्या.
यामुळे मागील पाच वर्षांपासून विरोधात असलेल्या वामन कुलकर्णी या ग्रामस्थाने विजयाच्या आनंदात सुपली ते पंढरपूर असा 20 किलोमीटरचे अंतर दंडवत घालून पूर्ण केले.
संत नामदेव महाराज पायरीजवळ येऊन दर्शन करून बी. वाय. ऍग्रो प्रणीत हनुमान ग्रामविकास पॅनेलकडून हा पण पूर्ण केला.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य मोहन घोलप, सुवानी यलमर, विठ्ठलचे माजी संचालक बाळासाहेब यलमर, ह. भ. प. मच्छिंद्र कावडे आदी उपस्थित होते.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज