टीम मंगळवेढा टाईम्स ।
उदय उमेश लळीत यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाचा शपथविधी सोहळा दूरदर्शनवर पाहताना सोलापूरकर अक्षरशः सुखावले. न्या. लळीत यांच्या रूपाने सरन्यायाधीशपदाचा हा बहुमान सोलापूरला पहिल्यांदाच मिळाला आहे.
लळीत घराणे तसे पाहता मूळचे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये-कोठारवाडीचे. परंतु शंभर वर्षापूर्वी हे या घराण्यातील रंगनाथ ऊर्फ आण्णासाहेब लळीत हे सोलापुरात आले आणि येथेच स्थायिक झाले.
ते स्वतः निष्णात वकील होते. त्यांचे पुत्र उमेश, जयंत, सुभाष आणि आनंद यांनीही वकिली व्यवसायाचा वारसा चालविला.
उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. त्यांचे पुत्र उदय आणि सुबोध हे तिसऱ्या पिढीतील आणि उदय यांचे पुत्र श्रीयश हे चौथ्या पिढीचा वकिली वारसा चालवत आहेत.
न्या. उदय लळीत यांचे आजोबा रंगनाथ लळीत वकील यांनी, स्वातंत्र्य लढ्यात १९३० साली सोलापुरात झालेल्या मार्शल लाॕ चळवळीत ब्रिटिश सैनिकांनी जो अमानुष अत्याचार केला होता, त्याबद्दल नुकसान भरपाईचे चार दावे न्यायालयात दाखल केले होते.
ब्रिटिश सत्तेविरूध्द त्यांनी निर्भयपणे न्यायालयीन लढाई केली होती.वन्या. उदय लळीत यांचे शालेय शिक्षण सोलापुरात हरिभाई देवकरण प्रशालेत झाले होते.
त्यांना वर्गात शिकविलेल्या निवृत्त शिक्षिका पुष्पा आगरकर यांनी आपला विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेताना त्या ऐतिहासिक सोहळ्यास आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी स्वतःला धन्यता मानली.
तर त्यांचे शालेय वर्गमित्र डॉ. अनिकेत देशपांडे, सागर भोमाज, सेबीचे मुख्य सरव्यवस्थापक आसलेले सुरेश गुप्ता, सुरेश बांदल, ॲड. भगवान वैद्य व त्यांच्या पत्नी माणिक वैद्य यांनीही ‘ याचि देही याचि डोळा ‘ हा शपथविधी सोहळा पाहिला.
लळीत कुटुंबीयांशी निगडीत ॲड. पांडुरंग ऊर्फ रवी देशमुख यांनाही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. हा शपथविधी सोहळा आपणांसाठी आणि वर्गमित्र उदय लळीत यांच्यासाठी जणू अमृत सोहळा होता, अशा भावना ॲड. भगवान वैद्य यांनी व्यक्त केल्या.
लळीत कुटुंबीयांसाठी तर हा सोहळा विशेष आनंदाचा आणि सुखावह होता. विशेषतः सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर उदय यांनी प्रथम वडील न्या. उमेश लळीत यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यावेळी वडील न्या उमेश यांना झालेला आनंद अवर्णनीय होता.
सोलापुरात लळीत कुटुंबीय भुईकोट किल्ल्याजवळ लकी चौकात स्वतःच्या वास्तुमध्ये अनेक वर्षे राहिले. लळीत कुटुंबीयांचे सोलापूरच्या वकिली क्षेत्रासह सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्रात नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत.
हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये रंगनाथ ऊर्फ आण्णासाहेब लळीत वृत्तपत्र विभाग तसेच वकिलांसाठी आनंदराव लळीत विधी ग्रंथ विभाग कार्यरत आहे. याच कुटुंबातील सविता लळीत यांनी सेवासदन शिक्षण संस्थेची अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली.
तसेच सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासह संचालक मंडळावरही त्यांनी काम पाहिले आहे.
सोलापूरचा कर्तबगार सुपुत्र उदय उमेश लळीत हे देशाचे सरन्यायाधीश झाल्यामुळे सार्वत्रिक समाधान व्यक्त करण्यात आले. विशेषतः वकिली क्षेत्रात विशेष आनंद व्यक्त करण्यात आला.
सोलापूर बार असोसिएशनने सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांचा सोलापुरात लवकरच नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्याचे ठरविले आहे.(स्रोत:लोकसत्ता)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज