टीम मंगळवेढा टाईम्स ।
व्यायामासाठी गेलेल्या एका महिलेला जीम प्रशिक्षक त्रास देत होता . यामुळे पीडित महिला व तिच्या पतीने जीममध्ये जाणे बंद केले. तरीही पीडित स्त्रीला तिचे व्हॉट्सअॅप चॅटिंग,
फोटो तिच्या पतीला दाखवण्याची धमकी देऊन जीम प्रशिक्षक वेळोवेळी त्रास देत होता. श्रीकांत गायकवाड याला रात्री अटक केल्याची माहिती निर्भया पथकप्रमुख प्रशांत भागवत यांनी दिली.
आपले शरीर तंदुरुस्त राहावे , यासाठी जीममध्ये जाणाऱ्या अनेक महिला , मुलींची जीम प्रशिक्षकाकडून लैंगिक छळवणूक झाल्याची माहिती निर्भया पथकासमोर आणली आहे.
याप्रकरणी जीम प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाड (वय २५, रा.पंढरपूर) याच्या विरोधात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पंढरपूर शहरातील एका जीममध्ये एक पती पत्नी व्यायाम करण्यासाठी जात होते. यावेळी जीम प्रशिक्षक श्रीकांत राजू गायकवाड (वय २६, रा.पंढरपूर ) याने डाएट्स घेण्याची माहिती देण्यासाठी त्या विवाहित स्त्रीला मोबाईलवर फोन करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर तो त्या स्त्रीच्या मोबाईलवर कॉल करून , व्हॉट्सअॅप मेसेज करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला.
त्यावेळी या स्त्रीने त्यास तुम्हाला ज्या काही सूचना द्यावयाच्या असतील त्या आम्ही पती-पत्नी जीममध्ये आल्यावर देत जा, असे सांगितले.
तरीही श्रीकांत गायकवाड हा वेळीअवेळी तिच्या मोबाईलवर कॉल करणे, व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करणे, इन्स्टाग्राम चॅटिंग, फेसबुक चॅटिंग, स्नॅपचॅट अशा प्रकारे चॅट करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.
पीडितेचा पती कामानिमित्त बाहेर असताना ती एकटी जीममध्ये जात होती. त्यावेळी त्या संधीचा फायदा घेऊन श्रीकांत हा विवाहित स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे,
व्यायामाच्या सूचना देण्याचा बहाणा करून वाईट हेतूने तिच्या अंगाला स्पर्श करणे असे प्रकार करत होता.
गायकवाड याच्याकडून या कृत्याबाबत विवाहित स्त्रीने तिच्या पतीस सांगितले. यानंतर पीडिता व तिचा पती यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून श्रीकांत गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे आले समोर…
पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या जीममध्ये तसेच सध्या कार्यरत असलेल्या जीममध्ये श्रीकांत गायकवाड याने प्रशिक्षक म्हणून काम करत असताना अनेक महिला व मुलींची लैंगिक छळवणूक केली आहे.
महिला व मुलींना गोड बोलून, त्यांची स्तुती करून व त्यांच्याशी मोबाईलद्वारे चॅटिंग करून त्यांना अलगदपणे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात श्रीकांत गायकवाड ओढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
ही कारवाई पंढरपूर निर्भया पथकप्रमुख स.पो.नि. प्रशांत भागवत, स.पो.फौ. दत्तात्रय आसबे पो.कॉ. नीलेश कांबळे , अरबाज खाटीक , पो . ना . नीता डोकडे , पो.कॉ क्षीरसागर , पो.हे. कॉ . अविनाश रोडगे यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज