टीम मंगळवेढा टाईम्स ।
महान गायिका स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं दीर्घ आजाराने 6 फेब्रुवारीला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्यावर जवळपास 29 दिवस उपचार सुरू होते.
कोरोनाची लागण झाल्याचं निमित्त होऊन या 93 वर्षीय गायिकेला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी लतादीदींच्या शेवटच्या दिवसांविषयी प्रथमच उघडपणे सांगितलं आहे.
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये डॉ. प्रतीत समदानी यांची टीम लतादीदींवर उपचार करत होती.
डॉक्टरांनी ई टाइम्सशी बोलताना सांगितलं की, “लतादीदींवर सर्व प्रकारचे उपचार सुरू होते. आम्ही शर्थ केली. पण त्यांना वाचवू शकलो नाही. मी दीदींच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत कायम असलेलं स्मित आयुष्यभर विसरू शकणार नाही.”
डॉ. प्रतीत समदानी लता मंगेशकर यांच्यावर आधीपासून उपचार करत होते “मी त्यांची ट्रीटमेंट करू लागल्यापासून लतादीदी प्रकृतीमुळे फारशा गप्पा मारत नसत.
पण त्या खूप समाधानी व्यक्ती होत्या. कुठल्याही उपचारांना त्यांनी कधी नकार दिला नाही. सर्वांना सारखी ट्रीटमेंट द्या, हा त्यांचा आग्रह असायचा. विशेष वागणूक द्यावी अशी त्यांची इच्छा कधीच नव्हती.
चेहऱ्यावर कायम एक मंद स्मितहास्य कायम असायचं. ते अगदी शेवटपर्यंत कायम होतं. मी कधीच ते विसरू शकत नाही,” असं प्रतीत समदानी यांनी सांगितलं. लता मंगेशकर यांच्या समाधानी, पॉझिटिव्ह आणि शांत वृत्तीबद्दल डॉक्टरांनी सांगितलं.
गेली दीडज-दोन वर्ष लता मंगेशकर यांची तब्येत थोडी नाजूक झाली होती. दोन वर्षांपूर्वी 28 दिवस रुग्णालयात उपचार घेऊन त्या सहीसलामत घरी परत आल्या होत्या.
पण यावेळी त्यांचा मृत्यूशी लढा अपयशी ठरला. 8 जानेवारीला त्यांना कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली. आणि शेवटी मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाला (स्रोत:News 18 लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज