टीम मंगळवेढा टाइम्स ।
‘म्हैसाळ’चे पाणी कालवा व तलावात सोडण्याच्या भगिरथ भालके यांच्या मागणीची दखल घेत कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा शब्द जयंत पाटील यांनी पाळला. म्हैसाळचे पाणी सोडल्याबद्दल तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना समाधान व्यक्त केले जात आहे.
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाला कालवा आणि तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे, अशा मागणीचे निवेदन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी शिष्टमंडळासह सांगलीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन नुकतेच दिले होते.
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात सलगर बुद्रूक येथे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबत शेजारधर्म पाळून मंगळवेढ्याला न्याय देऊ, असे सांगितले होते.
त्यामध्ये तालुक्याच्या दक्षिण भागात म्हैसाळ योजनेच्या कालव्याची कामे पूर्ण झाल्याने गतवर्षी या पाण्याची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर पाणी सोडण्यात आले नव्हते.
सध्या या भागातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेली भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीकडील थकबाकी आणि वीजबिल यातील तफावतीमुळे बंद आहे,
त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेती, जनावरांच्या पाण्याबाबत या भागातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते.
या योजनेचे पाणी कालव्याद्वारे तसेच शिरनांदगी, मारोळी, पडोळकरवाडी तलावात सोडल्यास शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटण्यास मदत होणार आहे.
या शिवाय म्हैसाळ योजनेत पूर्वेकडील गावांचा समावेश करणे, शिरनांदगी तलावाच्या कालव्याची अर्धवट कामे पूर्ण करणे व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंतीही या वेळी जयंत पाटील यांना करण्यात आली.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ फोन करत पाणी सोडण्याची सूचना केली होती.
सविस्तर मागणी लवकरच आपल्याकडे सादर होईल, असे सांगितले होते. ज्याप्रमाणे कालवा क्रमांक एकमधून पाणी यापूर्वी सोडण्यात आले, तर सध्या वितरिका क्रमांक दोनमधून पाणी सोडण्यात येत आहे.
शेतीच्या पाण्याची दाहकता लक्षात घेऊन भगिरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेल्या मागणीची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार.
या पाण्यामुळे या भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे, असे शिरनांदगीचे गुलाब थोरबोले यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीच्या प्रचारात शेजारधर्म पाळण्याबाबत दिलेल्या पहिल्या शब्दाचे पालन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. त्याबद्दल या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असतानाच
मंत्रालयात अडकलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते मार्गी लावून तालुका सुजलाम सुफलाम करण्याचा दुसरा शब्द जयंत पाटील यांनी प्रचाराच्या काळात दिला होता, त्याचे काय? असा प्रश्न या योजनेच्या लाभार्थी गावातून उपस्थित केला जात आहे. (स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज