टीम मंगळवेढा टाईम्स ।
वंचित बहुजन आघाडीनंतर आता सोलापुरात एमआयएम (MIM) देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची सोलापूर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असून कदम हे एमआयएमच्या तिकिटावर सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रमेश कदमांनी जर लोकसभा लढवली तर त्याचा फटका काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना बसणार असल्याची चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या उमेदवारी संदर्भात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार रमेश कदम यांच्याशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
सोलापूर लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असल्याने रमेश कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
रमेश कदम हे 2014 साली मोहोळ विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळा प्रकरणात झालेल्या घोटळ्यामुळे गेली अनेक वर्ष तुरुंगात होते.
काही महिन्यापूर्वी ते जामीनावर बाहेर आले असून आगामी लोकसभेच्या दृष्टीने तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.
वंचितच्या उमेदवाराचा काँग्रेसला फटका?
महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या लोकसभेच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर भाजपच्या राम सातपुतेंचं आव्हान आहे. त्याचवेळी वंचित आणि महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा फिस्कटल्याने वंचितने या मतदारसंघात राहुल काशिनाथ गायकवाड यांना तिकीट दिलं आहे. त्याचा फटका काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.
रमेश कदम एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढणार?
एकीकडे वंचितच्या उमेदवाराचा फटका काँग्रेसला बसणार अशी चर्चा सुरू असताना आता एमआयएम पक्षानेदेखील या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी वंचित आणि एमआयएमची युती असल्याने या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी जवळपास 1.70 लाख मतं घेतली होती. त्या निवडणुकीत सुशिलकुमार शिंदेंचा दीड लाख मतांनी पराभव झाला होता. आताही जर वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारांनी जास्त मतं घेतली तर ती काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत.
कोण आहेत रमेश कदम?
रमेश कदम हे 2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळमधून निवडून आले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी मागेल त्याला टँकर, मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्या ठिकाणी रस्ता दिल्याने चांगलेच लोकप्रिय झाले. आण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळामध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
तुरुंगातही वादग्रस्त ठरले होते
रमेश कमद हे तुरुंगातही गेल्यानंतर चांगलेच वादग्रस्त ठरले होते. तुरुंगात असताना त्यांनी पोलिसांना केलेली शिविगाल असो वा वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. रमेश कदम हे जवळपास आठ वर्षे तुरुंगात होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले.
रमेश कदम हे मांतग समाजातून असून या समाजाची मोठी संख्या आहे. तसेच मोहोळ आणि पंढरपूर परिसरात रमेश कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तुरुंगात असताना ज्या ज्या वेळी ते जामीनातून बाहेर यायचे त्या त्यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी व्हायची. आताही त्यांचं मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नी राजीनामा देणारा पहिला आमदार
राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राजीनामा देणारे रमेश कदम हे मराठा सोडून इतर समाजातील पहिलेच आमदार ठरले. त्यामुळे मराठा समाजातूनही त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच एमआयएमची उमेदवारी त्यांना जर मिळाली तर मुस्लिम मतांनी जर रमेश कदम यांना साथ दिली तर ते मोठ्या प्रमाणात मतं घेऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पहिला वंचितचा उमेदवार आणि आता रमेश कदम यांच्या उमेदवारीची चर्चा, यामुळे सोलापुरातील राजकीय गणितं नक्कीच बदलण्याची शक्यता आहे. याचा फटका मात्र काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मोठ्या प्रमाणात बसणार असं दिसतंय.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज