मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
भोळेपणाचा फायदा घेऊन ३० लाख कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने पाच एकर पाच गुंठे जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. ही घटना माढा तालुक्यातील दहीवली येथे घडली आहे.
याबाबतीत रेश्मा नवनाथ शिंदे (रा. दहीवली, ता. माढा) यांच्या फिर्यादीवरून शहाजी औदुंबर लांडगे (रा. दहीवली, ता. माढा) याच्या विरोधात माढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, शहाजी लांडगे यांनी रेश्मा यांचे पती नवनाथ यांच्या भोळेपणाचा फायदा घेत त्यांना २५ ते ३० लाख रुपये बँकेकडून कर्ज मिळवून देतो, असे म्हणत नवनाथ शिंदे यांच्या नावे असलेली वडिलोपार्जित पाच एकर पाच गुंठे जमीन गट नंबर ३९५ ही जमीन माढ्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात आणून स्वतःच्या नावावर खरेदी करून घेतली.
तेव्हा नवनाथ यांना सांगण्यात आले होते की, साहेब जे विचारतील, त्यास फक्त होय म्हणा व ते जिथे सही कर म्हणतील, तेथे सही करा, तरच आपले कर्ज मंजूर होईल, असे खोटे सांगून फिर्यादीच्या नावाची जमीन स्वतःच्या नावावर खरेदी करून घेतल्याबाबतची रेश्मा नवनाथ शिंदे यांनी ५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता माढा पोलिसात फिर्याद दिली आहे.
आरोपीला पकडून दिले पोलिसाच्या ताब्यात
संशयित आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, या प्रकरणाच्या तारखेसाठी शहाजी लांडगे हजर झाल्यावर फिर्यादी महिलेने नातेवाइकांच्या मदतीने शहाजी लांडगे यास पकडून माढा पोलिसात हजर केले.
पकडल्यानंतर आरोपीने झटापट केली. मात्र, नातेवाइकाच्या मदतीने आरोपीला माढा पोलिसांच्या ताब्यात दिले. माढा न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
खरेदीखत झाल्यावर सह्या कशासाठी…..
आरोपीला माढा पोलिस ठाण्यात आणल्याची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचायांना मिळताच त्यांनी माढा पोलिस स्टेशनमध्ये आरोपीच्या सह्या घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा सह्या घेण्याचा प्रकार बेकायदा असल्याचे सांगत पोलिस अधिकाऱ्यांनी या कर्मचायांना असे करता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे कर्मचारी सह्या न घेता रिकाम्या हाताने माघारी गेले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज