मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात बुधवारी रात्री घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण गावाला सुन्न करून गेली. अवघ्या दहा वर्षांच्या श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. अधिक वेदनादायक बाब म्हणजे, श्रावणने आपला अखेरचा श्वास आपल्या आईच्या मांडीवर घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्लीमध्ये राहणाऱ्या गावडे कुटुंबातील श्रावण बुधवारी संध्याकाळी गणेश मंडळाच्या शेडमध्ये मित्रांसोबत खेळत होता. तो नेहमीप्रमाणेच हसत-खेळत होता.
मात्र, काही क्षणांतच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. खेळ सोडून तो धावत घराकडे गेला आणि थेट आईच्या मांडीवर जाऊन विसावला. आईच्या कुशीत डोके ठेवून तो काहीतरी सांगू पाहत होता, पण क्षणार्धात त्याला तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि आईच्या मांडीवरच त्याने डोळे मिटले.
आईचा हंबरडा, गाव सुन्न
श्रावणच्या आईने टाकलेला आर्त हंबरडा आणि मदतीसाठीची धडपड पाहून शेजारी धावून आले. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हा मृत्यू अचानक आलेल्या हृदयविकारामुळे झाला. ही घटना संपूर्ण परिसरासाठी धक्कादायक ठरली आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
श्रावण हा इयत्ता चौथीत शिकत होता आणि आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या कुटुंबाने चार वर्षांपूर्वीच आपल्या लहान मुलीला गमावले होते, आणि आता श्रावणही अचानक काळाच्या पडद्याआड गेला. एकामागून एक अपघातांमुळे गावडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण कोडोली गाव हळहळून गेला असून, गावात शोककळा पसरली आहे.
काय म्हणाले डॉक्टर?
याबाबत हृदयरोग तज्ञ डॉक्टर अक्षय बाफना म्हणाले की, या वयाचे जे पेशंट असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी जेनेटिक आरोग्य समस्या असतात. किंवा हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये प्रॉब्लेम होऊन अशा समस्या होतात. एकाएकी काही त्रास झाल्यास, ताणतणाव असेल किंवा एकाएकी धावपळ केल्यानंतर हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होऊन असे अटॅक येऊ शकतात.
हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या दोन मुख्य रक्तवाहिनींमधील एखाद्या रक्त वाहिनीत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे हार्टअटॅक येऊ शकतात आणि पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होतो. हा धोका एकदम लक्षात आलेला नसतो, जेव्हा आपण स्क्रीनिंग करतो किंवा काही कारणामुळे पेशंटला थाप वगैरे लागली तर त्यानंतर चाचण्या केल्या जातात.
मात्र सर्वसाधारणपणे नियमित अशा चाचण्या होत नाहीत आणि त्यामुळे असे धोके निर्माण होतात. अनेकदा आपण पाहिलं आहे की मॅरेथॉनसारख्या रनिंग करुन आलेला धावपटू अचानक एकाएकी हृदयविकाराचा धक्का येऊन मृत्यू होतो, असे त्यांनी म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज