मोहोळ तालुक्यातील पोफळी येथील पंडित नाना कोळी यांना (ता.4 मार्च 2019) रोजी अज्ञात इसमाने फोन करून तुम्हाला 21 लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे, असे सांगून तुम्हाला जर बक्षीस नको असेल तर इनोव्हा गाडी मिळेल.
सुरवातीला 12 हजार 500 रुपये भरा,असे सांगून वारंवार वेगवेगळ्या खात्यावर अकरा लाख तीन हजार रुपये भरून घेऊन ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित नाना कोळी रा.पांडवाची पोफळी ता. मोहोळ यांना (ता.4 मार्च 2019) रोजी 7387666220 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला.
फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने कोळी यांना सांगितले की, तुमच्या नंबरवर 21 लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे. तुम्हाला जर बक्षीस नको असेल तर इनोव्हा गाडी लागली आहे.
जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल तर सुरवातीला केवळ 12 हजार 500 रु भरा. त्यावेळी कोळी यांनी आम्हाला गाडी नको 21 लाख रुपये माझ्या खात्यावर पाठवा असे सांगितले.
त्यावेळी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने सदरचे 21 लाख रुपये आम्ही तुमच्या खात्यावर पाठवू त्यापूर्वी तुम्ही आमच्या सरकारचा दोन टक्के टॅक्स भरा, अज्ञात व्यक्तीने दिलेल्या 38663348464 या बॅंक खाते क्रमांकावर त्यांनी फोन पे व गुगल पे वरून 21 हजार रुपये पाठवले.
त्यानंतर अज्ञात व्यक्तीने तुमचा 21 लाख रुपयांचा चेक तयार केला आहे. मात्र, बॅंक मॅनेजर चार टक्के दिल्याशिवाय सही करणार नाही, असे सांगून कोळी यांच्याकडून आणखी 86 हजार फोन पे व गुगल पे करून घेतले.
त्यानंतर अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या वेगवेगळ्या कारणावरून कोळी हे पैसे भरत गेले. कोळी यांना आपली ऑनलाइन फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सोलापूर येथे जाऊन सायबर सेल येथे तक्रारी अर्ज दिला.
दरम्यान 4 मार्च 2019 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत अज्ञात व्यक्तीने कोळी यांच्याकडून तब्बल 11 लाख 3 हजार रुपये इतकी रक्कम गुगल पे व फोन पे वरून तीन वेगवेगळ्या बॅंक खात्यावर मागवून घेत पंडित नाना कोळी यांना टोपी घातली.
याप्रकरणी कोळी यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर हे करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज