टीम मंगळवेढा टाईम्स ।
अंजनगाव सुर्जी तालुक्यात एका शेतकऱ्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली असून त्यात महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव लिहिण्यात आले आहे.
शेतकऱ्याने संत्रा विक्रीच्या प्रकरणात फसवणूक झाल्याने महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने न्याय मिळण्याकरिता अखेरची चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले?
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शेतकरी अशोक भुयार (५५) याने आपल्या शेतातील संत्र्याचा बार अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकला होता.
सदर शेतकऱ्याला व्यापाऱ्यांनी शेतामध्ये जबरदस्तीने मद्यप्राशन करुन त्यांना पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने सही घेऊन शेतकऱ्याला मारहाण केली. त्याबाबतची तक्रार देण्यास धनेगाव येथील पोलीस पाटील आणि सदर शेतकरी अशोक भुयार हे अंजनगाव पोलीस स्टेशनला गेले. त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव लिहित ‘आपली संत्रा विक्रीच्या प्रकरणात फसवणूक झाल्याने आपल्याला न्याय मिळवून द्या’, असे त्यात म्हटले होते.
चिठ्ठीत काय?
शेतकरी अशोक भुयार यांनी त्यांच्या धनेगाव येथील शेतातील संत्री अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकण्याचा व्यवहार केला.
मात्र, त्या दोन व्यापाऱ्यांनी भुयार यांना शेतामध्ये दारू पाजून संत्राविक्रीचे पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने सही घेतली. मारहाणदेखील केली.
त्याबाबतची तक्रार देण्यास ते धनेगाव येथील पोलीस पाटलासह अंजनगाव पोलीस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी गेले असता, त्याठिकाणी बीट जमादार व ठाणेदाराने बेदम मारहाण केली, असे लिहून त्याखाली अशोक भुयार यांनी इंग्रजीमध्ये स्वाक्षरी केली आहे.
पोलीस ठाण्यात जमाव
शेतकऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ठाणेदार व बीट जमादाराविरुद्ध गून्हा दाखल करण्याची मागणी संतप्त जमावाने केली. मंगळवारी दुपारपासूनच ठाण्यातील वातावरण कमालीचे चिघळले होते.
अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी तातडीने अंजनगाव पोलीस ठाणे गाठले. ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक पोलीस अधिकारी शेतकरी भुयार यांना मारहाण करीत असल्याचे दिसून आले.
यामुळे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. त्यानंतर मृताचा मुलगा गौरव अशोक भुयार याच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस
अधिकाऱ्यांकडे दिला आहे. मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक व दोन संत्रा व्यापाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला.-श्याम घुगे, अपर पोलीस अधीक्षक.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज