टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका व नगरपंचायतींचे पडघम वाजणार असून दोन मार्च ते पाच एप्रिल या कालावधीत प्रारुप प्रभाग रचना तयार करणे व त्यावर हरकती सूचना मागविण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
यामध्ये जिल्ह्यातील मुदत संपलेल्या मंगळवेढा, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, मोहोळ, दुधणी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, सांगोला या दहा व नव्याने तयार झालेल्या अकलूज नगरपरिषदेचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपंचायतींची मुदत ८ मे २०२१ रोजी संपली असून बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, दुधणी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला या दहा परिषदांची मुदत २९ डिसेंबर २०२१ रोजी संपली आहे.
या अकरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.
या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रारुप रचनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी २ मार्च ही मुदत आहे. प्रस्तावास मान्यता देण्यासाठी ७ मार्च ही मुदत आहे.
प्रारुप प्रभाग रचनेचे नकाशे व माहिती प्रसिद्ध करण्यासाठी १० मार्च ही मुदत असून १० ते १७ मार्च पर्यंत हरकती, सूचना मागविण्याचा कालावधी आहे.
या हरकती व सूचनांवर २२ मार्च रोजी जिल्हधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. २५ मार्च रोजी संपूर्ण अहवाल निवडणूक आयोगाला पाठविणे आवश्यक आहे.
१ एप्रिल रोजी राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देतील तर ५ एप्रिल रोजी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे.
या निवडणुकांवर ठरणार विधानपरिषदेचा आमदार
सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या जागेवरील आमदार प्रशांत परिचारक यांच्या जागेसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम लागणार आहे.
या जागेवर आमदारपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या नजरा या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालावर लागल्या आहेत.
त्यामुळे भाजप व महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न या नगरपालिका निवडणुकीत करणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज