टीम मंगळवेढा टाईम्स ।
टी20 वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरून टीम इंडियाने अब्जावधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं. 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप आणि 11 वर्षांचा आयसीसी चषकांचा दु्ष्काळ दूर केला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना खूपच आनंद झाला आहे.
बारबाडोसमध्ये टीम इंडियाने विजय मिळवून स्वप्नपूर्ती केली आहे. त्यामुळे टीम इंडियाला पाहण्यासाठी भारतीय आतूर झाले आहेत.
कधी एकदा भारतीय टीम मायदेशी परतते आणि आनंद सोहळा साजरा होतो, याची उत्सुकता आहे. पण भारतीय चाहत्यांना आणखी काही दिवस रोहित सेनेची वाट पाहावी लागणार आहे.
बारबाडोसमधील वादळी स्थितीमुळे भारतीय संघाला परतण्यासाठी आणखी दिवसांचा अवधी लागू शकतो. बारबाडोसमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वातावरण आहे.
हवामान खात्यानुसार, पुढच्या काही तासात चक्रवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 170-200 किमी वेगाने वारे वाहू शकतात.
वादळी स्थिती पाहता स्थानिक प्रशासनाने ब्रिजटाऊनमधील विमानतळ बंद केले आहेत. तर टीम इंडियाला हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितलं आहे. रविवारी रात्री 8 वाजल्यापासून विमानतळ बंद करण्यात आलं आहे.
तसेच पुढील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. रिपोर्टनुसार, बीसीसीआय खेळाडूंना आणण्यासाठी चार्टर प्लेनची व्यवस्था करू शकते. 70 जणांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
यात क्रिकेटपटू, त्यांचे कुटुंबिय, सहयोगी स्टाफ आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बीसीसीआय सचिव जय शाह याकडे बारकाईने पाहात आहेत.
मिडिया रिपोर्टनुसार, जय शाह यांची फ्लाइट सोमवारी सकाळची होती. मात्र त्यांनी टीम इंडियाला असंच सोडून जाण्यास नकार दिला. त्यांनी टीम इंडियाला घेऊनच जाणार असल्याचं सांगितलं आहे.
काही रिपोर्टनुसार टीम इंडिया 2 जुलैला भारतात येऊ शकते. पण हे सर्वकाही वातावरणावर अवलंबून आहे.टी20 वर्ल्डकप अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला होता. त्यामुळे दोन्ही स्पर्धकांनी सोमवारी कॅरेबियन बेट सोडण्याची योजना आखली होती.
मात्र हा सामना ठरल्या दिवशी म्हणजेच 29 जूनला संपला. तसेच राखीव दिवशी खेळण्याचा प्रश्नच उरला नाही. मात्र पुढचं सर्वच नियोजन फिस्कटलं. असं असलं तरी भारतीय चाहते आपल्या संघाची आतुरतेने वाट पाहात आहेत.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज