टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हयातील ऊस कारखाने सुरु झाले असताना अदयाप एकाही कारखान्याने दर जाहिर न केल्यामुळे शेतकरी वर्ग संभ्रमात पडला आहे.

दरम्यान आधी दर घोषित करा व मग ऊस तोडणी सुरु करा ही भूमिका शेतकर्यांनी घेतली असून माचणूर येथे ब्रम्हपुरी,माचणूर,अरळी,सिध्दापूर येथील शेतकर्यांनी हम सब एक है हा नारा हाती घेत
साखर कारखान्याकडे जाणारा ऊसाचा ट्रक थांबवून चालकास पुष्पहार घालून ऊस दराची घोषणा केल्याशिवाय ऊस वाहतूक करू नका असा सबुरीचा सल्ला देवून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले.
सोलापूर जिल्हयात नुकतेच साखर कारखाने चालू झाले असून एकाही साखर कारखानदारांनी यंदाच्या हंगामातील ऊस दराची घोषणा न केल्यामुळे यंदा आपल्या ऊसास दर किती मिळणार याबाबत शेतकरी वर्ग संभ्रमात पडला आहे.

कारखानदारांची दरबाबत जशी एकी दिसून येते त्याप्रमाणे हम सब एक है चा नारा शेतकर्यांनी हाती घेवून गुरुवारी सायंकाळी 5.30 वा.माचणूर चौकात ऊसाने भरून येणारी वाहने अडवली.
वाहनचालकांचे पुष्पहार घालून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. भैरवनाथ शुगरकडे कंदलगाव येथून ऊस घेवून येणारा ट्रक शेतकर्यांनी अडवून आपल्या कारखान्याने मागील हंगामात केवळ 2100 रुपये दर दिला असल्याची जाणीव करून देत

संबंधित कारखान्याच्या अधिकार्याला फोन करून इतर कारखान्याने एफ.आर.पी पूर्ण केली मात्र आपण केवळ 2100 रुपयेच दिल्याने
शेतकरी वर्ग नाराज झाल्याची आठवण संबंधित अधिकार्यांना शेतकर्यांनी करून दिली असल्याचे उपस्थित शेतकर्यांकडून सांगण्यात आले.

यापुढे दर घोषित केल्याशिवाय रस्त्यावरून वाहने जावू देणार नसल्याचे व टायरमधील हवा सोडण्याचा इशारा उपस्थित शेतकर्यांनी दिला आहे.
शेजारच्या पंढरपूर तालुक्यात मोठया प्रमाणात आंदोलनाची धग सुरु असताना मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्यांनीही स्वयंस्फुर्तीने पुढे येवून आंदोलनास प्रारंभ केला आहे.

कारखान्यांनी दराची घोषणा न केल्यास आंदोलन तीव्र स्वरूपात करण्याचा इशारा नदीकाठच्या भागातील शेतकर्यांनी दिला आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











