टीम मंगळवेढा टाईम्स ।
ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी समाजघटकातील सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे. खात्रीशीर फायदा देणारे पीक म्हणजे ऊस तर ऊस सोडून अन्य पिकांची शेती म्हणजे तोटा अशी मानसिकता निर्माण होऊन ऊसाला नगदी पीक म्हणून राज्यात ऊसशेतीला शेतकऱ्यांनी मोठी पसंती दिली.
या ज्वलंत प्रश्नावर मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील डॉ.अतुल निकम यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा या कवितेच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत.
ऊसाच्या अतिरिक्त उत्पादनामुळे आता ऊस उत्पादक शेतकरीराजा चांगलाच अडचणीत आला असून ऊस लागवड, जोपासना व ऊसतोड तसेच ऊस बिल बँकेत जमा होणे या सर्वच पातळीवर ऊस बागायतदार म्हणून मोठेपणाने मिरवणाऱ्या शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात परवड होत आहे.
शेती करत असताना झुकेगा नहीं साला म्हणणाऱ्या शेतकऱ्यांला आता क्षणोक्षणी हात पसरावे लागत असल्याने तुम्हीच सांगा आम्ही करायचं तरी काय? हा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
शेतीची आर्थिक गणितं ठरवीत असताना वर्षानुवर्षे पारंपरिक पध्दतीने केल्या जाणाऱ्या शेतीत ऊस सोडून अन्य पिके घेणं म्हणजे तोटा असे मत पूर्वजांनी पुढील पिढीपुढे मांडले आणि पिढ्यानपिढ्या अनेक जण ऊस शेती हा पर्यायच स्वीकारू स्वीकारू लागले.
वाढीस लागलेली ऊस पाहता साखर कारखान्यांची संख्याही वाढू लागली. आपल्या परिसरात साखर कारखाना सुरू झाला आहे आणि आपणासही ऊस बागाईतदार म्हणून ओळखले जावे यासाठी पिढ्यानपिढ्या ऊस शेती नसणाऱ्यांनीही ऊसशेती हा पर्याय स्वीकारला.
साखर कारखानदाराकडूनही ऊसशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येऊ लागल्या. एकीकडे निसर्गाने साथ दिली की ऊस शेतीत वाढीव उत्पादन होत असताना दुसरीकडे साखर कारखानदारीतील अंतर्गत राजकारणामुळे अनेक कारखाने बंद पडू लागले आणि येथेच ऊस शेतीचं गणित कोलमडू लागले.
नगदी पीक म्हणून ऊस शेतीचा पर्याय निवडत असताना शेतकऱ्यांना अनेक गोष्टीवर मात करत पुढे जावे लागते. ऊस पिकाला पाणी जास्त लागते म्हणून बोअर घेणे, वाढीव उत्पादनासाठी रासायनिक खताबरोबर गावरान खताची मात्रा, विजेच्या वेळापत्रकानुसार रात्र-रात्र जागणे,
महिना-दोन महिने गेले की डेपी जळाला हे ठरलेलं,सतरा-अठरा महिने ऊसाची जोपासना योग्य पध्दतीने करणे,ऊस तोड होत असताना कारखाना चिटबॉय, मुकादम यांना महिनाभर आमची ऊस तोड करा म्हणून मागे लागणे, ऊसतोड करायची असेल तर एकरी एवढी रक्कम द्यावी लागेल,
ऊस तोड घेऊन जात असताना ट्रॅक्टर शेतात अडकला तरी तो बाहेर काढण्यासाठी पैसे ठरलेले आणि सारं काही करून ऊस कारखान्याला गेल्यानंतर महागाई कितीही वाढली तरी ठरलेल्या ऊस बिलाची वाट पाहणे हे ऊस उत्पादक करण्याऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी येते.
काही वेळेला तर कारखाना बंद होतो की काय म्हणून पोटच्या मुलाप्रमाणे जपलेला ऊस काळजावर हात ठेवून स्वतःच पेटवावा लागतो.
झुकेगा नहीं साला म्हणणाऱ्यां ऊस बागायतदाराला आता मात्र वेळोवेळी सर्वापुढे हात पसरावे लागतात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांला असे सगळीकडे हात पसरावे लागत असताना अनेकजण मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र सर्वदूर दिसते.
आता शेतकऱ्यांनीही पारंपारीक शेतीला बगल देत नगदी पीक असणाऱ्या ऊस शेती बरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन पिके घेतली तर तोट्याची ठरू पाहणारी शेती फायद्याची ठरू शकते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
कवितांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या व्यथा मांडली : डॉ.अतुल निकम
वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलो तरी एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती नेहमी पाहत आहे. मीही काही कवितांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या व्यथा मांडली परंतु मांडलेल्या व्यथा या अनेकांच्या ओठी येत नाही. ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी समाजघटकातील सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे.-डॉ.अतुल निकम,मरवडे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज