मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झालेले अजित पवार यांची भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेत त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
खरं तर राष्ट्रवादी सोडल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पवारांपासून लांब राहणेच पसंत केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील एका कार्यक्रमात हे दोघे एकत्र आले होते.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडणारे मोहिते पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील त्यावेळी इच्छुक होते मात्र, जिल्ह्यातील दुसऱ्या गटाकडून त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात येत होता. ताकद असूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असणाऱ्या कोंडीतून बाहेर पडण्याचा आग्रह रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे करत होते.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून जिह्यातील दुसऱ्या गटाला ताकद देण्यात येत होती, दुसरीकडे आपल्याला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना मोहिते पाटील यांच्यात बळावत होती. त्यातच माढ्यातून तिकीट मिळत नसल्याचे लक्षात येताच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला
थोरल्या पवारांपेक्षा अजितदादा पवार यांच्याकडून आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना बळ दिले जात आहे असा आक्षेप मोहिते पाटील गटाचा होता. खुद्द मोहिते पाटील यांनी कधीही केला नाही. मात्र समर्थकांचा तसा आक्षेप होता.
त्यातूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आज त्याच अजित पवार यांची रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतल्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
भाजप मध्येही मोहिते पाटलांची गेल्या काही दिवसांपासून कोंडी होत असल्याचे सांगितले जात आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकद लावून निवडून आणले त्या निंबाळकरांशी मोहिते पाटील यांचे किती सख्य आहे, हे अख्खा सोलापूर जिल्हा जाणून आहे. एकाच पक्षात असून त्या दोघांचेही थोडेही जमत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.
या मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभेला इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी दोन रणजितसिंहांमध्ये स्पर्धा आहे. हा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपकडे आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये हा राष्ट्रवादीकडे होता त्यामुळे माढ्यातून इच्छुक असलेल्या रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेणे हे सूचक मानले जात आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर माळशिरस तालुक्यातील पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांनी अजित दादा पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. त्यानंतर तालुक्यातील दुसरे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही अजित पवार यांची भेट घेतल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हे दोन्ही राजकीय विरोधक एकाच म्यानात कसे समाविष्ट होणार असा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाला पडलेला आहे.
गेल्या लोकसभेला माळशिरस तालुक्यातून एक लाखापेक्षा अधिक मताचे लीड रणजितसिंह निंबाळकर यांना मोहिते पाटील यांनी दिले होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पण राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव झाला होता,
त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांशी जुळवून घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांची ही भेट सदिच्छा भेट आहे की आगामी काळातील काही राजकीय घडामोडींची चाहूल देणारी आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज