मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गुरुवार दि.२५ मे रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेल्या महसूल भवनाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला मसुरी येथे प्रशिक्षणाला असलेले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सुट्टी घेऊन आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
आज गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता महसूल भवनाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांची उपस्थिती राहणार आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय , सहाय्यक, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक, निवासी उपजिल्हाधिकारी, नागरिकांसाठी कक्ष, व्हीआयपी कक्ष, राजशिष्टाचार, नैसर्गिक आपत्ती, महसूल, गृह, आस्थापना, लेखा विभाग, अंतर्गत लेखा विभाग, सामान्य प्रशासन,
कुळ कायदा, गौण खनिज, ग्रामपंचायत, पुनर्वसन, नगर विकास शाखा नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होतील. तर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी, निवडणुक, जिल्हा व शहर पुरवठा, भूसंपादन क्रमांक १, ३, ७, ११ ही कार्यालये शिफ्ट होणार आहेत.
इंद्रभुवन इमारतीचेही लोकार्पण
११० वर्षांच्या हेरिटेज वास्तू असलेल्या नूतनीकृत इंद्रभुवन इमारतीचे लोकार्पणही गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली.
इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूला जतन करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या ५. १३ कोटीच्या निधीतून नुतनीकरण करण्यात आले आहे. साधारणतः ११ महिन्यात या इमारत नूतनीकरणाचे काम सनरक्षण हेरिटेज कन्सल्टंट या कंपनीमार्फत करण्यात आले.
या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई कायमस्वरूपी करण्यात आली आहे. यामुळे अत्यंत मनोहारी आणि विलोभनीय असे इमारतीचे दर्शन घडत आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कार्यकर्त्यांचा मेळावा
उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे आज सोलापूरला येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहर- जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी व शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली.
आज दुपारी ३ वाजता शहरातील हेरिटेज येथे होणाऱ्या या बैठकीस शहर जिल्ह्यातील आमदार, खासदार, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक यांच्यासह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यासाठी शहर व जिल्हा पदाधिकारी, ग्रामीण मंडल पदाधिकारी, शहर मंडल पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कार्यकारिणी सदस्य शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख, बूथ प्रमुख व सर्व कार्यकर्त्यांनी दुपारी ३ वाजता हेरिटेज गार्डन येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज