टीम मंगळवेढा टाइम्स।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपच्या वतीने मंगळवेढ्याचे युवा उद्योजक समाधान अवताडे यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे.
भाजपकडून प्रमुख दावेदार समजणारे परिचारकांची समजूत काढण्यात भाजप पक्षश्रेष्ठींना यश आले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांमध्ये परिचारक आणि अवताडे एकत्र आल्याने तसेच पंढरपूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष नागेश काका भोसले यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार भगीरथ दादा भालके यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन एक मोठे समीकरण तयार केले आहे . 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये समाधान आवताडे यांनी अपक्ष निवड लढवली होती.
या दोन्ही निवडणुकांमध्ये भालके, परिचारक आणि अवताडे अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. 2014 च्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय भारत नाना भालके यांना 91 हजार 863 इतकी मते मिळाली होती.
तर आमदार प्रशांत परिचारक हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना 82 हजार 950 मतदारांनी मतदान केले होते . तर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणारे समाधान आवताडे यांनी तब्बल 40 हजार 910 इतकं मताधिक्य घेतलं होतं.
आता भाजपने परिचारक आणि अवताडे यांना एकत्र करीत राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. 2014 झालेले मतदान पहाता परिचारक – आवताडे यांच्या मतदानाची बेरीज 1 लाख 23 हजार 860 इतकी होते.
जी आकडेवारी आमदार भारत भालके यांच्या मतदानापेक्षा 31 हजार 997 नी जास्त आहे.
आता 2019 ची आकडेवारी पाहता आमदार भारत भालके यांच्या पारड्यात 89 हजार 787 मतदारांनी आपले मत टाकले होते.
तर स्व. सुधाकरपंत परिचारक यांना 76 हजार 426 मतांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी समाधान आवताडे यांच्या मताधिक्क्यात वाढ होऊन त्यांना 54 हजार 124 मतदान झाले होते.
2019 ची परिचारक आणि आवताडे यांच्या मतदानाची बेरीज केल्यास ती 1 लाख 26 हजार 550 होते. भालके यांच्या पेक्षा 36 हजार 763 मतं अधिकची होताहेत.
त्यामुळे परिचारक आणि आवताडे यांचे घडून आलेले मनोमिलन राष्ट्रवादी समोर मोठं आव्हान असणार आहे.
आता पंढरपूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष नागेश काका भोसले यांची उमेदवारी देखील राष्ट्रवादीला धोक्याची घंटा मानली जातेय.
मिस्टर नगराध्यक्ष असलेले नागेश भोसले यांच्या पंढरपूरात दांडगा जनसंपर्क आहे.
त्यांच्या पत्नी जनतेतून नगराध्यक्षा झाल्या आहेत. 2016 च्या नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत त्यांच्या पत्नी साधनाताई भोसले यांनी 20 हजार 754 मतदान घेऊन विजयी झाल्या होत्या.
नागेश भोसले यांचा पंढरपूरच्या 22 गावांमध्ये मोठा जनसंपर्क आहे. भोसलेना मानणारा वर्ग हा विधानसभेला भालके यांच्या सोबत असतो. आणि नगरपालिकेला भोसले यांच्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे भोसलेंची दावेदारी भालके यांच्या डोक्याला ताप देणारी असणार आहे.
एकंदरीतच भाजपने मांडलेले परिचारक – आवताडे समीकरण आणि भोसलेंची उमेदवारी पंढरपुर विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे बदलू शकते का ? हे आता 2 मे रोजीच कळणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज