टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सांगोला तालुक्यातील अंबिका देवी यात्रेनिमित्त भरविण्यात येणारे विविध कार्यक्रम व यात्रेनिमित्त भरविण्यात येणारा पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारा जनावरांचा बाजारही रद्द करण्यात आला आहे.
सांगोला तालुक्यातील अंबिका देवी यात्रेबाबत तालुकास्तरीय समितीची व यात्रेचे कोर्ट रिसिव्हर्स, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या समवेत नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असल्याने यात्रा भरविण्याबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात आली.
सांगोला येथील यात्रा प्रसिद्ध असून यात्रेनिमित्त भरविण्यात येणाऱ्या जनावरांच्या बाजारामध्ये आसपासच्या जिल्ह्यांमधून जनावरे खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने येत असतात.यात्रेमध्ये शेतकरी, व्यापारी, लहान- मोठी मुले यात्रा बघण्यासाठी व जनावरे खरेदी- विक्री करण्यासाठी येत असल्याने यात्रेमुळे प्रचंड गर्दी होऊन पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यात्रेमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु अशा नियमांचे पालन यात्रा भरल्यानंतर होणार नसल्याने येथील अंबिका देवीची यात्रा व यात्रेनिमित्त भरविण्यात येणाऱ्या जनावरांचा बाजारही रद्द करण्यात आला आहे.
तसेच अंबिका देवी यात्रेनिमित्त येथील रविवारी (ता. 21) रोजीचा जनावरांचा आठवडा बाजारही रद्द करण्यात आला आहे.या बैठकीस तहसीलदार अभिजित सावर्डे- पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, मुख्याधिकारी कैलास केंद्रे,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरीष गंगथडे, पशुवैद्यकीय अधिकारी, अंबिका देवी यात्रा कमिटीचे कोर्ट रिसिव्हर्स ऍड. संजीव शिंदे, ऍड. आर. पी. चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज