टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर येथे 26 नोव्हेंबरला कार्तिकी वारी होणार असून त्यावेळी पंढरीत वारकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन होणार नाही.
वारकऱ्यांच्या संख्येत आरोग्य यंत्रणा अपुरी पडेल. त्यामुळे यंदाची कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, मानाच्या दिड्यांनी पंढरीकडे मार्गस्थ होऊ नये. पांडूरंगाचे धार्मिक विधी पंरपरेनुसार पार पडतील.
मात्र वारकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांना त्यानुसार आदेश द्यावेत, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला आहे.
मंदिरे सुरु झाल्यानंतर पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने आता दररोज दोन हजार भाविकांना मुखदर्शनासाठी सोडले जात आहे. मात्र, आठ महिन्यांपासून श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर बंद असल्याने यंदा कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल.
त्या गर्दीत वयस्क भाविकांना श्वास घेण्यास अडचणी येतील, दर्शन रांगेत तथा वाळवंटात, मठात वारकऱ्यांची गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकणार नाही. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवल्यास सध्याची पाच किलोमीटरची रांग 25 किलोमीटरपर्यंत जाईल.
गर्दीमुळे आरोग्य यंत्रणाही अपुरी पडेल. त्यामुळे वाळवंट परिसरात, 65 एकर परिसरात वारकऱ्यांना राहता येणार नाही. तत्पूर्वी, मंदिर समितीच्या ठरावावर प्रातांधिकाऱ्यांनी अभिप्राय देत तो प्रस्ताव जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात आला. त्यानुसार तो प्रस्ताव आता विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेला आहे.
दरम्यान, कोरोनामुळे वारकऱ्यांनी वारीदिवशी पंढरपुरात गर्दी न करता इतरवेळी टप्प्याटप्याने दर्शनासाठी यावे. आता स्वत:च्या घरी तथा गावातच वारी साजरी करावी, असे आवाहन प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
कार्तिक वारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या आगमनाच्या दृष्टीने प्रशासन व मंदिर समितीतर्फे सर्व उपाययोजना केल्या आहेत. मात्र, पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरु आहे.
त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यासाठी मान्यता घ्यावी, असाही प्रस्ताव विधी व न्याय विभागाला जिल्हा प्रशासनाकडून पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतरच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे.
कार्तिक वारीचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठविला
कार्तिक वारीनिमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून भाविकांना यंदाची वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून सरकार दरबारी पाठविला आहे.– तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज