टीम मंगळवेढा टाईम्स ।
मतदान केंद्रावरील बूथ उभारलेल्या व्यक्तीला पोलिसांकडून विचारणा करताना त्याने निरीक्षक असल्याचे सांगितले. ओळखपत्र तपासणी केली असता सदरचा प्रकार खोटा असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
वसंतराव नाईक हायस्कूल, लष्कर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. अल्ताफ अ. लतीफ शेख (वय ४५, रा. दक्षिण सदर बझार, सात रस्ता, सोलापूर), असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी महिला फौजदार संजीवनी व्हट्टे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, मंगळवारी सर्वत्र सकाळपासून मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होती.
सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास लष्कर परिसरातील वसंतराव नाईक हायस्कूल येथे बंदोबस्तासाठी महिला फौजदार संजीवनी व्हट्टे या कर्तव्य बजावत होत्या.
यावेळी मतदान केंद्राजवळ उभ्या असलेल्या नमूद व्यक्तीला व्हट्टे यांनी विचारणा केली. त्याने निरीक्षक असल्याचे सांगत गळ्यातील महाराष्ट्र शासनाचे आयकार्ड ओझरते दाखविले.
यावेळी खातरजमा करण्यासाठी फौजदार व्हट्टे यांनी पुन्हा विचारणा केल्यानंतर ‘मी प्रीसायडिंग ऑफिसर’ आहे, असे सांगितले. प्रत्यक्ष त्याचे आय कार्ड तपासले असता ते ‘महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळा’चे असल्याचे दिसून आले.
बूथ क्रमांक १८९; १९० येथील प्रीसायडिंग ऑफिसर महादेव लंगाडे यांच्याकडे खात्री केली. सदर व्यक्ती कोणत्याही मतदान केंद्रावरील बूथवर प्रीसायडिंग ऑफिसर व निरीक्षक नसल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार नमूद व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार देडे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज