टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात दहावीची परीक्षा आज एक मार्चपासून सुरू होत आहे. यंदा दहावीसाठी ६५ हजार ७४९ परीक्षार्थी १८२ केंद्रावर परीक्षा देणार आहेत.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथके नियुक्त केली आहेत. नेमलेल्या नऊ भरारी पथकात प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, महिला अधिकारी, आदी विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत.
एका पथकात सात ते आठ अधिकारी आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांना केंद्रावर येणे बंधनकारक केले असून, आज पहिला पेपर मराठीचा असून, वेळ ११ ते २ अशी असणार आहे.
परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेरील दीडशे मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. विद्यार्थ्यांना साडेदहालाच परीक्षा केंद्रात यावे लागणार आहे.
परीक्षा काळात पोलिस, होमगार्ड, महसूल विभागाचे पथक, शिक्षण विभागाचे पथकांचे पथके असणार आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्ह्यात सर्वच संबंधितांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले आहे.
दहा मिनिटं वाढीव
विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. गतवर्षीप्रमाणेच मार्च २०२४ परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.
जीपीएसप्रणाली सुरू ठेवणं आवश्यक
परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहायक परीरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत.
प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचेपर्यंत, उत्तरपत्रिका आणण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या सहायक परीरक्षक (रनर) यांनी जीपीएसप्रणाली सुरू ठेवणं आवश्यक आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज