मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को-जन. इंडस्ट्रिज लि. या साखर कारखान्याने माझ्या नावावर परस्पर इंडियन ओव्हरसीज या बँकेतून 2 लाख 98 हजार रुपयांचे कर्ज काढले असल्याची माहिती तक्रारदार शेतकरी गुलाब नबीलाल शेख (मु.पो. मंद्रुप, ता. द. सोलापूर) येथील पत्रकार परिषदेत दिली.
लोकमंगल कारखान्याचे शेअर्स खरेदी व ड्रिपसाठी मतदान कार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड व इतर कागदपत्रे दिली होती. त्यानंतर या कागदपत्रांचा लोकमंगल कारखान्याने गैरवापर करून 16 जानेवारी 2016 रोजी माझ्या परस्पर बँकेत खाते उघडले होते. ज्यावेळी द्राक्ष लागवडीकरिता कर्ज काढण्यासाठी मी बँकेत गेलो तेव्हा मला कोणत्याही बँकेत कर्ज प्रकरणच मंजूर होत नव्हते.
त्यावेळी मी कर्जाची चौकशी केली असता, हे कर्ज लोकमंगल शुगर इथेनॉल कारखान्याने काढल्याचे कळाले. कर्ज प्रकरणावर सर्व खोट्या सह्या करून कर्ज काढले आहे तसेच जामीनदार म्हणून महेश एस. देशमुख, लोकमंगल शुगर इथेनॉल, आर. आय. विभुते आदींची नावे आहेत. त्या 2 लाख 98 हजार कर्जाचे व्याज मिळून आज 4 लाख 51 हजार 764 रुपये कर्ज दाखवित आहे. हे कर्ज काढून ते माझ्या परस्पर दुसर्याच्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचा आरोप शेख यांनी केला.
लोकमंगल कारखान्याने आमच्या खोट्या सह्या करून जे कर्ज काढले आहे त्याप्रकरणी कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ व एमडी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सदर बझार पोलिस स्टेशन यांच्याकडे केल्याचेही शेख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस जि. प. चे माजी सभापती आप्पाराव कोरे, शेखर बंगाळे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.शेतकरी गुलाब शेख यांच्या नावावर कर्ज काढले आहे का याबाबत मला माहिती नाही. मी माहिती घेऊन सांगेन.- मनीष देशमुख, चेअरमन, लोकमंगल शुगर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज