टीम मंगळवेढा टाईम्स ।
सन २०१४ व २०१९ मध्ये झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत आवताडे गटात मतविभाजन झाल्याने या दोन्ही निवडणुकीत भालके गटाला लाभ झाला. त्यामुळे या पोटनिवडणुकीत परिचारक व आवताडे गट एकसंध ठेवून राष्ट्रवादीला धोबीपछाड देऊन पोटनिवडणुकीत चमत्कार दाखविण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात येत आहे.
ही रणनीती किती यशस्वी होणार ?, निवडणुकीत परिचारक गटाचा उमेदवार असणार की आवताडे गटाचा, याचा गुंता मात्र अद्याप सुटला नाही.मात्र , ही निवडणूक पंढरपूरकर परिचारक गटाच्या अस्तित्त्वाची, तर मंगळवेढेकर आवताडे गटाच्या प्रतिष्ठेची ठरणारी आहे.
मित्र पक्षातील शिवसेना नेत्या शैला गोडसे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सचिन पाटील यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज भरले आहेत.त्यामुळे आघाडीतील बिघाडी राष्ट्रवादीसाठी चितेची बाब असल्याचे बोलले जात आहे. २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालिन आ.सुधाकर परिचारक यांची उमेदवारी कापत तेथे राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी भारत भालके यांनी विक्रमी मते घेत मोहिते – पाटील यांचा पराभव केला होता.
तेव्हापासून या मतदार संघावर परिचारक गटाची पकड सैल झाली.२०१४ साली झालेल्या निवडणुकीत भालके यांच्या विरोधात प्रशांत परिचारक यांना उतरविण्यात आले. या निवडणुकीतही भालके यांनी विजय संपादन केला. त्यावेळी प्रशांत परिचारक यांना दुसऱ्या, तर समाधान आवताडे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
२०१९ च्या निवडणुकीत भालके यांच्या विरोधात भाजपने ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांना निवडणूक रिंगणात उतरविले.भालके, परिचारक, आवताडे अशा तिरंगी निवडणुकीत भालके यांनी विजय संपादन केला. यातही सुधाकर परिचारक यांना दुसऱ्या, तर समाधान अवताडे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
२०१४ व २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परिचारक व आवताडे गट एकत्रित असते तर या निवडणुकीत चित्र वेगळे दिसले असते. हीच बाब अधोरेखित करून या पोटनिवडणुकीत परिचारक व आवताडे गटातील संभाव्य मत विभाजनाचा लाभ राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होऊ नये, यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात येत आहे.
भाजपच्या या रणनीतीवरच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील निकाल अवलंबून आहे. भाजपकडून आवताडे व परिचारक गट एकत्रित यावा संपादन यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात, त्यांना यश येणार का, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
मात्र या निवडणुकीत भाजपने आपणास पुरस्कृत करावे यासाठी समाधान आवताडे हे आग्रही आहेत.भाजपने पुरस्कृत केल्यास मतदार संघातील मागासवर्गीय व मुस्लिम मते आपल्या पारड्यात पड़तील व विजयाचा मार्ग सुकर होईल या आवताडे यांच्या धोरणाला भाजपकडून मात्र विरोध आहे.
आवताडे यांनी कमळ या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी पक्षाकडून आग्रह केला जात आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
कार्यकर्त्यांचा आग्रह अन् पक्षाचे धोरण ; परिचारक गट दुहेरी संकटात
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक आ.प्रशांत परिचारक यांनी लढवावी यासाठी त्यांच्याकार्यकर्त्यांकडून आग्रह केला जात आहे. विधान परिषदेची मुदत सहा महिने आहे. त्यामुळे या निवडणुकीत परिचारक गटाने आवताडे गटाला संधी द्यावी.
यानंतर आगामी काळात होणारी विधानसभा निवडणूक ही परिचारक गटाने लढवावी , असा भाजपचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे . त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह व पक्षाचे धोरण या गुंत्यात परिचारक गटाचा निर्णय सध्या अडकून पडला आहे. त्यामुळे आ.परिचारक हे कार्यकर्त्यांच्या आग्रहाला प्राधान्यक्रम देणार , की पक्षाचे धोरण मान्य करणार , यावर या निवडणुकीतील बरीचगणिते अवलंबून आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज