मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
उजनी धरणात मंगळवारी सायंकाळपर्यंत १०५.२५ टक्के जलसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सततचा पाऊस आणि पुणे जिल्ह्यातील धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.
त्यामुळे सायंकाळी सात वाजता धरणातून ७५ हजार तर वीजनिर्मितीसाठी एक हजार ६०० विसर्ग सोडण्यात येत असल्याने भीमा नदीत ७६ हजार ६०० क्युसेक विसर्ग मिसळत आहे. पुराच्या शक्यतेने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर सतत पाऊस पडत असून हवामान विभागाने रेड ॲलर्ट दिलेला आहे. भीमा व नीरा खोऱ्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.
सध्या दौंड येथून उजनी धरणात एक लाख क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे १०५ टक्के भरलेल्या उजनीच्या साठ्यात बुधवारी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पूरनियंत्रणासाठी रात्री नऊपासून ७५ हजार क्युसेक वेगाने भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीपात्रातील साहित्य, जनावरे तत्काळ हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिवसभरात विसर्ग १६०० वरुन ७५ हजार ६०० क्युसेकवर
सकाळी सहा वाजता उजनीतून एक हजार ६०० क्युसेक विसर्ग होता. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्याने दुपारी १२ वाजता तो पाच हजार, दुपारी दोन वाजता १० हजार, दुपारी चार वाजता १५ हजार तर सायंकाळी पाच वाजता २५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.
पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन खबरदारी म्हणून सायंकाळी सात वाजता विसर्ग ४१ हजार ६०० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर रात्री आठ वाजता तो ६१ हजार ६०० करण्यात आला.
नदी काठावरील सर्वांना सतर्कतेचा इशारा
पूरनियंत्रणासाठी उजनीतून मोठा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकीनुसार धरणातून विसर्ग कमी – जास्त होण्याची शक्यता आहे.- एस. एस. मुन्नोळी, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर, ता. माढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज