टीम मंगळवेढा टाईम्स ।
नगरपालिका गणेश विसर्जन मिरवणुकीतील पाच जणांनी कुटुंबासह भाजीपाला आणि किराणा खरेदी करण्यासाठी आलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाच्या गाडीत गुलाल टाकून त्यांना काठीने मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन प्रक्षाळे, सोमनाथ बनसोडे, विद्याधर बनसोडे, अनिकेत ढावरे, हर्षद बनसोडे याचा नातेवाईक व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सांगोला पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात हे भाजीपाला व किराणा खरेदी करण्यासाठी पत्नी व दोन मुलांसह आले होते.
किराणा माल खरेदी करून चारचाकी गाडीतून घराकडे जात असताना अण्णा भाऊ साठे पुतळा ते जयभवानी चौकाकडे जाणाऱ्या रोडजवळील अन्नपूर्णा बेकरीसमोर नगरपालिका गणेश विसर्जन मिरवणुकीतील
सचिन प्रक्षाळे याने सहायक पोलिस निरीक्षक खरात यांच्या गाडीत गुलाल टाकला. त्यावेळी खरात यांनी कार्यकर्त्यांना गाडीत गुलाल टाकू नका, असे सांगितले.
त्यावेळी एकाने गाडीपुढे उभारून अजून जास्त गुलाल गाडीत टाक, असे सांगितले. दुसऱ्या व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडून, शिवीगाळ करून तू कोण लागून गेला आहे आम्हाला विचारणारा, असे
म्हणून सहायक पोलिस निरीक्षक खरात यांना गाडीच्या बाहेर खेचून मारहाण केली. तसेच सोमनाथ बनसोडे, विद्याधर बनसोडे, अनिकेत ढावरे, हर्षद बनसोडे याचा नातेवाईक व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी देखील मारहाण केली. त्यातील एकाने तेथेच पडलेली काठी घेऊन खरात यांच्या पोटात मारली.
त्याचवेळी नगरपालिकेत काम करणारा दीपक जानकर तेथे आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक खरात यांनी त्यास गणपती मंडळातील माणसे मारहाण करीत असल्याचे सांगितले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी वरील लोकांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज