मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यात आणखी तीन नवीन नगरपंचायती तयार करण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे.
माळशिरस तालुक्यातील वेळापूर व माढा तालुक्यातील मोडनिंब या दोन्ही ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचातीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परिपूर्ण प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील करकंब ग्रामपंचायतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून हा प्रस्ताव देखील परिपूर्ण करून राज्य शासनाला पाठविला जाणार आहे.
जिल्ह्यात सध्या माढा, माळशिरस, अनगर, श्रीपूर-महाळुंग, वैराग व नातेपुते या सहा ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आहे. या शिवाय बार्शी, पंढरपूर, करमाळा, सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, कुर्डुवाडी, अकलूज व मोहोळ या ११ ठिकाणी नगरपरिषद कार्यरत आहे.
वेळापूर, मोडनिंब व करकंब येथे नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील नगरपंचायतींची संख्या ९ वर तर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या २० वर पोचणार आहे.
गावांची वाढती लोकसंख्या, लोकसंख्येला मूलभूत सुविधा देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून मिळणारा अपुरा निधी, ग्रामविकास विभागाच्या असलेल्या त्रोटक योजना यामुळे अनेक मोठ्या गावांनी नगरपंचायतींचा मार्ग स्वीकारल्याचे दिसत आहे.
गावांचा विकास यासोबत येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील होणारी विधानपरिषदेची निवडणूक हे देखील महत्त्वाचे राजकीय कारण मानले जात आहे. करकंबचाही प्रस्ताव लवकरच शासनाला पाठविला जाणार आहे.
शासनाकडून या तिन्ही नगरपंचायतींच्या स्थापनेसाठी पहिली अधिसूचना काढून त्यावर दावे व हरकती मागविले जाणार आहेत. या दावे, हरकतींवर सुनावणी घेऊन शासनाला जिल्हा प्रशासनाचा अहवाल सादर होणार आहे.
हा अहवाल सादर झाल्यानंतर शासनाकडून नगरपंचायत स्थापनेची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होईल. या अधिसूचनेनंतर ग्रामपंचायत बरखास्त होऊन, काही दिवसांसाठी नगरपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे.
‘कुंभारी’चा निर्णय प्रलंबित
दक्षिण सोलापूर तालुक्यात कुंभारी येथे नगरपरिषद स्थापन करण्यासाठी २०२२ मध्ये प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पहिली अधिसूचना प्रसिद्ध होऊन त्यावर दावे व हरकती, सुनावणी ही प्रक्रिया झाली आहे.
शासनाकडून अंतिम आदेश होणे बाकी असताना कुंभारीतील शिवानंद आंदोडगी व श्रृती निकंबे यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने हा विषय प्रलंबित राहिला आहे.
न्यायालयाकडून अद्याप काही आदेश नसल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली आहे. या याचिकेत शासनाची बाजू मांडण्यासाठी अक्कलकोट नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज