टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाखांहून अधिक असून रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे. शहरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असून विडी उद्योग, गारमेंट, वस्त्रोद्योगावर अवलंबून अनेकजण आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच दुकाने उघडण्यास काही तास परवानगी द्यावी, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसनचे सचिव असिम गुप्ता यांची बैठक बोलावली आहे.
आज सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग कमी होत असतानच सोलापूरच्या ग्रामीण भागाची चिंता अजूनही मिटलेली नाही.
तर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन शिथिलतेसंदर्भात जाहीर केलेल्या निकषांनुसार शहरातील दुकाने सुरू होण्यासाठी लोकसंख्येचा अडथळा आला. त्यातच ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी काढलेला निर्णय शहरासाठी आहे तसाच लागू करण्यात आला.
15 एप्रिलपासून कडक निर्बंध असल्याने शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंदच आहेत. त्यामुळे अनेकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधक आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी व्यापाऱ्यांच्या बाजूने उभारले असून त्यांनी निवेदने देऊनही निर्णय न झाल्याने आज महापालिकेसमोर आंदोलन केले.
तत्पूर्वी, आमदार प्रणिती शिंदे व आमदार संजय शिंदे यांनी त्यांच्या परीने वरिष्ठ स्तरावरूनच सकारात्मक निर्णय व्हावा, असा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासंदर्भात बैठक बोलावली असून, मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
तर महापालिकेच्या आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावासंदर्भातही त्या ठिकाणी चर्चा होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णयाची शक्यता वर्तविली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज